संघर्ष आणखी भडकणार, जगाचे बारकाईने लक्ष
वृत्तसंस्था / बीजिंग
अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे. चीनने अमेरिकेला अतिशय कठोर शब्दांमध्ये इशारा दिला आहे. ‘वाघाच्या कातडीसाठी तुम्ही वाघाशीच भांडण्याचा प्रयत्न करीत आहात,’ अशा वैशिष्ट्यूर्ण शब्दांमध्ये चीनच्या सरकारी माध्यमांनी हा इशारा अमेरिकेला सोमवारी दिला.
चीनकडून होणारी निर्यात कमी कराल तर, अमेरिका तुम्हाला व्यापार शुल्कात सवलत देईल, असा प्रस्ताव अमेरिकेने चीनशी व्यापार करणाऱ्या अनेक देशांसमोर ठेवला आहे. त्यामुळे चीन भडकला आहे. चिनी परराष्ट्र व्यवहार विभागाच्या एका प्रवक्त्याने सरकारी माध्यमांसमोर केलेल्या वक्तव्यात अमेरिकेच्या या नव्या प्रस्तावाचा निषेध केला आहे. अमेरिकेचा हा प्रस्ताव जागतिक वर्चस्ववादाच्या प्रवृत्तीतून निर्माण झाला आहे. असा प्रस्ताव आंतरराष्ट्रीय व्यापार विषयक नियमांचा उघड भंग आहे. अमेरिका चीनच्या मित्रांना त्याच्यापासून दूर करु शकत नाही. ते घातक ठरेल, असे प्रतिपादन या प्रवक्त्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.
आर्थिक वरचष्मा
अमेरिका चीनला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याची इच्छा बाळगून आहे. त्यासाठी तो देश नवेनवे पवित्रे घेत आहे. पण, अन्य देशांना आमिषे दाखवून त्यांना चीनपासून व्यापारदृष्ट्या दूर करणे, हे अयोग्य आहे. यातून अमेरिकेला कदाचित तात्कालीक लाभ होईल. परंतु, त्यामुळे जगाच्या आर्थिक व्यवहारांची घडी विस्कटणार असून अंतिमत: ते अमेरिकेलाही हानीकारक ठरणार आहे. त्यामुळे हे धोरण वेळीच मागे घेतलेले बरे, असा इशारा या प्रवक्त्याने दिला आहे.
तीव्र प्रतिक्रिया उमटेल
अमेरिकेने करसवलत देऊन चीनशी व्यापार करणाऱ्या देशांना चीनपासून दूर करण्याचा प्रयत्न केल्यास या धोरणाची तशीच तीव्र प्रतिक्रिया उमटणार आहे. चीनही मग स्वस्थ बसणार नाही. अशी स्थिती चीन कधीही स्वीकारणार नाही. अमेरिकेने हे धोरण लागू केल्यास चीनही अतिशय प्रखर प्रत्युत्तर देईल. आपल्या अधिकारांचे संरक्षण करण्याची इच्छाशक्ती आणि क्षमता चीनकडे आहे, हे ध्यानात ठेवा, असेही प्रतिपादन चीनकडून सोमवारी करण्यात आले आहे.
संरक्षणवाद अहितकारक
अमेरिका आता आपल्या आर्थिक धोरणांमध्ये संरक्षणवाद आणत आहे. तसेच जगाची अर्थव्यवस्था अमेरिकाकेंद्री करण्याचा प्रयत्न करीत आहे. तथापि, ही चाल साऱ्या जगासाठी अत्यंत धोक्याची ठरणार असून सर्व देशांना याचा फटका बसणार आहे. विश्व समुदायाने अमेरिकेच्या या धोरणांशी एकत्र येऊन संघर्ष करावा, असे उघड आवाहनही चीनने केल्याने दोन्ही देशांमधील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.
दोन्ही देशांमध्ये स्पर्धा
सध्याच्या काळात अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांमध्ये एकमेकांवर व्यापार शुल्क लावण्याची स्पर्धा होत आहे. अमेरिकेने चीनवर प्रथम 56 टक्के आणि नंतर 145 टक्के व्यापार शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर चीननेही अमेरिकेवर 145 टक्के व्यापार शुल्क लावत असल्याची घोषणा केली. त्यानंतर, अमेरिकेने आता चीनवर 245 टक्के इतका कर लावला असून चीनही त्याचे प्रत्युत्तर देत आहे. तसेच दोन्ही देशांकडून एकमेकांच्या विरोधात अत्यंत आक्रमक भाषा केली जात असून व्यापार युद्ध भडकले आहे. अमेरिकेची चीनशी असणारी व्यापारी तूट 300 अब्ज डॉलर्स इतक्या प्रचंड प्रमाणावर पोहचली असून ती अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसाठी डोईजड होताना दिसत आहे. त्यामुळे ती कमी करण्यासाठी चीनने अमेरिकडून होणारी आयात मोठ्या प्रमाणावर वाढवावी, अशी अमेरिकेची इच्छा आहे. अन्यथा अमेरिका चीनकडून होणारी आयात कमी करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठीच करांमध्ये वाढ केली जात आहे.









