पंतप्रधान मोदी उत्सुक, संबंध सुधारण्याची शक्यता
वृत्तसंस्था / नवी दिल्ली, वॉशिंग्टन डीसी
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे उत्तम मित्र असून दोन्ही देशांमधील व्यापार करार शक्य आहे, असा संकेत चार दिवसांपूर्वी दिल्यानंतर आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा भारताची प्रशंसा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्रम्प यांच्या नव्या वक्तव्याचे स्वागत केले असून अमेरिकेशी संवाद साधण्यास मी उत्सुक आहे, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे व्यापार शुल्कामुळे ताणले गेलेले दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा सुधारण्याची शक्यता आहे.
भारताशी चर्चा करण्यात काहीही अडथळा नसून व्यापार चर्चा होईलच, अशी मला शाश्वती आहे. ही चर्चा यशस्वीही होईल. येत्या काही आठवड्यांमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा होणे शक्य आहे, असेही अध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या नव्या संदेशात स्पष्ट केले आहे. या संदेशाला भारतानेही तितकाच उत्कट आणि त्वरित प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांविषयी नवा आशावाद निर्माण झाला आहे, अशी प्रतिक्रिया अनेक तज्ञांनी दिली आहे.
‘ट्रूथ सोशल’वरचा संदेश
भारताशी व्यापार चर्चा होत असून, दोन्ही देशांमधील व्यापार अडथळे दूर करण्याच्या दृष्टीने ही चर्चा होत आहे. माझे उत्तम मित्र नरेंद्र मोदी यांच्याशी येत्या काही आठवड्यांमध्ये चर्चा करण्यास मी उत्सुक आहे. माझा निश्चितच असा विश्वास आहे, की भारताशी आमची व्यापार चर्चा यशस्वी होईल, असा संदेश अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रूथ सोशल’ वेबसाईटवर प्रसारित केला आहे.
पंतप्रधान मोदी यांचा प्रतिसाद
अध्यक्ष ट्रम्प यांच्या संदेशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्वरित आणि सकारात्मक असा प्रतिसाद दिला आहे. भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश निकटचे मित्र आहेत. तसेच ते नैसर्गिक भागीदार आहेत. एक सुयोग्य व्यापार करार करण्यासाठी दोन्ही देश चर्चा करीत असून हा करार लवकरात लवकर होईल, असा माझा विश्वास आहे, अशा शब्दांमध्ये हा प्रतिसाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ या माध्यमावर दिला आहे. यामुळे येत्या काही दिवसांमध्ये भारत आणि अमेरिका यांच्या संबंधांवर सकारात्मक स्थिती निर्माण झाली आहे.
शुक्रवारचा संदेश
गेल्या शुक्रवारीही ट्रम्प यांनी भारतासंबंधी अनुकूल संदेश प्रसारित केला होता. त्यातही त्यांनी ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे उत्तम मित्र आहेत. त्यांची काही धोरणे मला मान्य नाहीत. तथापि, अमेरिका आणि भारत यांच्यात एक विशेष संबंध आहेत. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही. काहीवेळा आमच्यात काही क्षण असे निर्माण होतात, असे स्पष्ट करत, स्थिती निवळत असल्याचा संकेत दिला होता.
त्या संदेशालाही प्रतिसाद
शुक्रवारच्या संदेशालाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्सुक प्रतिसाद दिला होता. मी ट्रम्प यांच्या भावनांचा आदर करतो. भारत आणि अमेरिका यांच्या संबंधांचे त्यांना केलेले सकारात्मक विश्लेषण मी मानतो. भारत आणि अमेरिका यांच्यात अतिशय सकारात्मक, सर्वंकष आणि जागतिक, तसेच भविष्याभिमुख भागीदारीचे संबंध आहेत, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडणी केली होती.
पुढे काय घडणार…
ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के व्यापार शुल्क लावण्याची घोषणा केल्यानंतर दोन्ही देशांमध्ये व्यापार तणाव वाढला होता. ट्रम्प यांच्या काही सहकाऱ्यांनी भारताच्या विरोधात अनेक टोकाची विधाने केली होती. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा सुधारणार नाहीत, अशी शक्यता वाटत असतानाच आता पुन्हा संबंधांमध्ये काहीसा ओलावा निर्माण झाला आहे. ही प्रक्रिया अशीच राहिली तर कदाचित दोन्ही देशांमध्ये लवकर एक व्यापारी करार होऊ शकतो, असे मत आहे.









