कृषी पणन संचालकांची कारवाई : शेतकऱ्यांच्या लढ्याला यश : चौकशी पथक पाठवून केली पाहणी
बेळगाव : अटींचे उल्लंघन झाल्याने बुडा आयुक्तांनी यापूर्वीच जय किसान भाजी मार्केटचा ‘लँड युज’बदल रद्द केला आहे. त्यापाठोपाठ कृषी पणन संचालकांनी व्यापार परवाना (ट्रेड लायसेन्स) देखील रद्द केल्याचा आदेश जारी केला आहे. त्यामुळे बेकायदेशीररित्या सुरू असलेले भाजी मार्केट अखेर बंद झाल्याने शेतकऱ्यांसह आपल्या लढ्याला यश आले आहे, असे सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद, अॅड. नितीन बोलबंडी आणि राजकुमार टोपण्णावर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. याबाबतची माहिती देण्यासाठी सोमवारी दुपारी शहरातील एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना सुजित मुळगुंद म्हणाले, शेतकऱ्यांची सोय व्हावी यासाठी राज्य सरकारने 2019 मध्ये एपीएमसी आवारात सुसज्ज भाजी मार्केट उभारले आहे. याकामी तब्बल 1 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. जय किसान भाजी मार्केटचे बांधकाम करण्यात आल्यानंतर महापालिकेकडून परवाना घेण्यात आला आहे. खासगी भाजी मार्केट माफिया विरोधात लोकांकडून सातत्याने तक्रारी जात होत्या. मात्र आता कृषी पणन संचालकांनी खासगी भाजी मार्केटची ट्रेड लायसन्स रद्द केली असल्याने त्या ठिकाणी आता कोणत्याही प्रकारचा व्यापार करता येणार नाही. या लढ्यात पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार असिफ सेठ यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.
चौकशी पथक पाठवून पाहणी केली
अॅड. नितीन बोलबंडी म्हणाले, जय किसान भाजी मार्केटमध्ये व्यापारी शेतकऱ्यांकडून 8 ते 10 टक्के कमिशन घेत होते. लसूण आणि आल्याची एपीएमसी वगळता अन्य कोठेही खरेदी विक्री करता येत नाही. शेतकऱ्यांकडून मार्केटमध्ये येणाऱ्या भाजीपाल्याचा लिलाव केला पाहिजे. जय किसानमध्ये कोल्ड स्टोअरेज नाही. तसेच कोणत्याही प्रकारचे रेकॉर्डस् ठेवण्यात आलेले नाहीत. अनेक तक्रारी गेल्यानंतर सरकारने चौकशी पथक पाठवून पाहणी केली. परवाना नसताना मार्केट उभारण्यात आले. एपीएमसीमधील जागेत कोट्यावधी रुपये खर्च करून हायटेक भाजी मार्केट उभारले आहे. एपीएमसी भाजी मार्केट बंद पडले असते तर सरकारचा पैसा वाया गेला असता. आता या माध्यमातून सरकारला कर स्वरुपात उत्पन्न मिळेल. शेतकऱ्यांच्या व यासाठी लढणाऱ्यांचा हा विजय असल्याचे ते म्हणाले.
राजुकमार टोपण्णवर म्हणाले, जय किसान भाजी मार्केट माफिया विरुद्ध आपण सर्वांनी लढा दिला आहे. यासाठी पालकमंत्री सतीश जारकीहोळी, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार असिफ सेठ यांनी मोलाची साथ दिल्याने या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागण्यास मदत झाली. अन्यथा आणखी किती दिवस लोटले असते माहिती नाही. तत्कालीन एपीएमसी अध्यक्ष शिवनगौडा पाटील यांच्या कार्यकाळात एपीएमसी आवारात हायटेक भाजी मार्केट उभारण्यात आले आहे. शेतकऱ्यांकडून खासगी भाजी मार्केटचे व्यापारी 8 टक्के कमिशन स्वीकारत होते. अटींचे उल्लंघन झाल्याने बुडा आयुक्तांनी यापूर्वीच भाजी मार्केटचा लँड युजबद्दल रद्द केला आहे. यानंतर आता ट्रेड लायसन्सही रद्द करण्यात आल्याने व्यापाऱ्यांनी कमिशन स्वरुपात शेतकऱ्यांकडून आकारलेली 8 टक्के कमिशन रक्कम व्याजासह शेतकऱ्यांना परत केली पाहिजे. एपीएमसीमध्ये 250 गाळे आहेत. त्यापैकी बहुतांश गाळ्यांचा वापर सुरु आहे. ज्या कोणाला त्या ठिकाणी जाऊन व्यापार करायचा आहे त्या ठिकाणी व्यापार करावा, असे ते म्हणाले.
भाजी मार्केटच्या स्थलांतरासाठी समिती स्थापन
जय किसान भाजी मार्केटचा व्यापार परवाना रद्द केल्याचा आदेश जारी होताच जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी भाजी मार्केटचे स्थलांतर करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या समितीची स्थापना केली आहे. यामध्ये अध्यक्ष म्हणून प्रांताधिकारी, सदस्य उपसंचालक, कृषी पणन खाते, तहसीलदार बेळगाव, सचिव एपीएमसी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.









