सेन्सेक्स 313 अंकांनी तेजीत : बँकांचे समभाग चमकले
मुंबई :
बुधवारीही भारतीय शेअर बाजाराने तेजी राखण्यात यश मिळवलं आहे. सेन्सेक्स 313 अंकांनी वाढत बंद झाला आहे. मेटल निर्देशांक वगळता इतर निर्देशांक तेजीसमवेत बंद झाले आहेत.
बुधवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 313 अंकांनी वाढत 82693 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा समावेश असलेला निफ्टी निर्देशांकही 91 अंकांनी वाढीसह 25330 अंकांवर बंद झाला. बँक निफ्टी निर्देशांक 345 अंकांनी वाढत 55493 च्या स्तरावर बंद झालेला दिसला. बँक निफ्टी व फायनॅन्शीयल निफ्टी निर्देशांक सलग 11 व्या दिवशी तेजी राखत बंद झाले आहेत. पीएसयु बँक निर्देशांकाला तेजी राखण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र व पंजाब नॅशनल बँक यांनी तेजीसह चांगले सहकार्य केले. यांच्यासोबत कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांनीही तेजी राखली होती. निफ्टीमध्ये टाटा कंझ्युमर्स व एसबीआय यांनी चमकदार कामगिरी केली होती. मारुती सुझुकी, अल्ट्राटेक सिमेंट, टेक महिंद्रा यांचे समभाग तेजीत होते. टायटन, आयटीसी, एसबीआय लाइफ, बायोकॉन, मॅरीको यांचे समभाग घसरणीत होते. ऑइल व गॅस व रियल्टी निर्देशांक सलग सहाव्या सत्रात तेजीसह कार्यरत राहिलेले दिसले. याचदरम्यान मिडकॅप100 49 अंकांनी वधारत 58848 अंकांवर तर स्मॉलकॅप100 124 अंकांनी वाढत 18423 अंकांवर बंद झाला होता. दुसरीकडे संरक्षण विषयक कंपन्या गार्डनरिच शिपबिल्डर्स, झेन टेक्नॉलॉजीस, डाटा पॅटर्न्स, एमटीआर टेक यांचे समभाग तेजीत असलेले दिसले. बातम्यांच्या आधारावर वेदांता, आदित्या बिर्ला कॅपिटल, ड्रीमफोक्स यांचे समभाग घसरणीत तर ह्युंडाई मोटरचे तेजीत दिसले.
जागतिक बाजारात मिश्र कल
जागतिक बाजारात पाहता अमेरिका व युरोपातील बाजारात मिश्र कल दिसला. अमेरिकेतील डोव्ह जोन्स फ्युचर्स 30 अंकांनी तेजीत तर एस अँड पी500 व नॅसडॅक निर्देशांक अल्पशा घसरणीत व्यवहार करत होते. हँगसेंग निर्देशांक मात्र दमदार तेजी अनुभवत होता. हा निर्देशांक 500 अंकांनी मजबुत दिसून आला. कोस्पी 36 अंकांनी नुकसानीत तर शांघाय कंपोझीट 14 अंकांनी घसरणीत होता.









