सातारा / प्रतिनिधी :
कारंडवाडी (देगाव ता. सातारा) गावच्या हद्दीतून ट्रॅक्टर-ट्रॉलीत बसून याच गावातील सात-आठ महिला शेतातील काम उरकून घराकडे निघाल्या होत्या. यावेळी कॅनॉल शेजारून जात असताना ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात चार महिला कॅनॉलमध्ये बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर दोन महिला जखमी झाल्याने त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
उल्का भारत माने (वय 55), अरुणा शंकर साळुंखे (वय 58), सीताबाई निवृत्ती साळुंखे (वय 65), लिलाबाई शिवाजी साळुंखे (वय 60) सर्व राहणार कारंडवाडी (ता. सातारा) अशी मयत महिलांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शनिवारी सकाळी कारंडवाडी गावातील 7 महिला शेतात मजुरीसाठी गेल्या होत्या. दुपारनंतर पावसाने हजेरी लावली. पावसाचा जोर कमी-जास्त होऊन सर्वत्र चिखल झाला होता. महिला साडेचार वाजण्याच्या सुमारास पुन्हा घराकडे निघाल्या. यावेळी ट्रॅक्टर-ट्रॉलीची चाके चिखलाने भरली होती. ही ट्रॅक्टर-ट्रॉली कारंडवाडी-जैतापूरच्या हद्दीत असणाऱ्या कण्हेर उजव्या कालव्याच्या कॅनॉलवरील पुलावर आली. काही सेकंदात टायर घसरून ट्रॉली घसरली. ट्रॉलीतील दोन महिलांना हे कळताच त्यांनी उडय़ा मारल्या. परंतु उल्का भारत माने, अरुणा शंकर साळुंखे, सीताबाई निवृत्ती साळुंखे, लिलाबाई शिवाजी साळुंखे या ट्रॉलीसहीत कॅनॉलमध्ये पडल्या. यामुळे त्या पाण्यात बुडाल्या. ही बाब ट्रॅक्टर चालकाच्या लक्षात येताच त्याने आरडाओरडा केला. हे पाहून ग्रामस्थ व वाहनधारकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघाताची माहिती तालुका पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. परंतु चारही महिलांचा बुडून मृत्यु झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
गावावर शोककळा
अपघाताची घटना कळताच हळहळ व्यक्त
कारंडवाडी गावातील या महिला नेहमी एकत्र मजुरीसाठी शेतात जात होत्या. यातील अरुणा शंकर साळुंखे, सीताबाई निवृत्ती साळुंखे, लिलाबाई शिवाजी साळुंखे तिघीही एकाच भावकीतील असल्याची माहिती मिळत आहे. नेहमीप्रमाणे सोबत शेतात जाणे व येणे असा प्रवास त्यांचा होता. परंतु शनिवारी होणाऱ्या अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांना व नातेवाईकांना चांगलाच धक्का बसला. सर्वत्र या अपघाताने हळहळ व्यक्त होत होती.
यंदाच्या पावसाळ्यातील पहिलाच अपघात
पावसाळा सुरू झाला की, वाहने घसरून अपघात होण्याच्या घटना घडत असतात. यंदाही हीच परिस्थिती दिसत आहे. सर्वांना पावसाची चिंता होती. तोच शनिवारी पावसाने हलक्या सरी कोसळत हजेरी लावली आणि पहिल्याच दिवशी कारंडवाडी येथे ट्रॅक्टर-ट्रॉली घसरून अपघात होवून चार महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.









