संतोष पाटील,कोल्हापूर
देशभर सरासरी चांगला पडलेला चांगला पाऊस, शेतीमालाची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) सुधारणा, विविध शासकीय योजना, सुलभ कर्जपुरवठा, प्रसिद्ध ट्रॅक्ट ब्रँड्सद्वारे उच्च एचपी ट्रॅक्टरचा शोध आदी कारणांमुळे भारतातील ट्रॅक्टर विक्रीने ट्रॅक्टर विक्रीच्या त्यांच्या सर्वकालीन विक्रमांना मागे टाकले आहे. 2022-23 मध्ये (31 मार्चपर्यंत) 9 लाख 44 हजार युनिट्सची विक्रीचा नवीन उच्चांक नोंदवला आहे. गतवर्षी 2021-22 या आर्थिक वर्षात 8 लाख 42 हजार 196 ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांनी खरेदी केले होते. यंदाच्या तुलनेत सरासरी 12.24 टक्क्यांनी विक्रीत वाढ झाली.
महिंद्रा ट्रॅक्टरने भारतामध्ये 3 लाख 89 हजार 531 1 ट्रॅक्टरची विक्री करून आतापर्यंतची सर्वाधिक देशांतर्गत विक्री गाठली आहे. टॅफेच्या मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टरने 1 लाख 69 हजार 750 ट्रॅक्टर विक्री नोंदवून यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. जॉन डीअर 82 हजार 658 ट्रॅक्टर्सची विक्री झाली. न्यू हॉलंडने ट्रॅक्टर विक्रीच्या 35 हजार 367 युनिटची विक्री केली. सोनालिका ट्रॅक्टर्सने 1 लाख 51 हजार 160 युनिटस् विकले. पाठोपाठ एस्कॉर्ट्स समूहाचा क्रमांक येतो, एस्कॉर्ट्स कुबोटा (फार्मट्रॅक ट्रॅक्टर, पॉवरट्रॅक ट्रॅक्टर आणि डिजिट्रॅक ट्रॅक्टर) एका वर्षात 95 हजार 266 युनिट्सची विक्री केली.
भारतातील हवामान संस्थांनी यावर्षी जुलै-सप्टेंबर 2023 दरम्यान एल निनो घटनेच्या संभाव्यतेचा अंदाज वर्तवला आहे. यापूर्वी एल निनोच्या परिणामामुळे 2015 आणि 2016 मध्ये मान्सून कमी झाला होता. त्यामुळे शेतीच्या उत्पन्नात 135 टक्के तर ट्रॅक्टर विक्रीत 10 टक्के घट झाली होती. हवामान, शेती उत्पन्न आणि ट्रॅक्टरची विक्रीचा संबंध असल्याचे अहवाल सांगतो.
ट्रॅक्टर विक्री ही प्रामुख्याने पाऊस आणि त्यावर पिकणाऱ्या शेतीवर अवलंबून असते. चांगला मॉन्सून नसेल तर याचा परिणाम ट्रॅक्टर विक्रीवर होतो. 2014 मध्ये 6 लाख 96 हजार 828 ट्रॅक्टर विक्रीचा आकडा पार झाला. त्यानंतर 2015 व 2016 मध्ये चांगला मॉन्सून त झाल्याने विक्रीमध्ये अनुक्रमे 10 टक्के आणि 9 टक्के घट झाली होती. त्यानंतर एप्रिल 2017 ते जानेवारी 2018 या कालावधीत ट्रॅक्टर उद्योगाने विक्रीमध्ये गरुडझेप घेत 16.6 टक्के वाढ नोंदवली आहे. या कालवधीत देशांतर्गत 6 लाख 59 हजार 170 ट्रॅक्टरची विक्री झाली होती. त्यानंतर ट्रॅक्टर विक्री जोमात राहिली.
दोन वर्षांपुर्वी 2020 मध्ये 8 लाख 99 हजार 329 ट्रॅक्टर 26.9 टक्के वाढीसह विकले गेले. मात्र, मार्च 2021 नंतर पुन्हा विक्री मंदावली. वर्षाला सरासरी साडेनऊ लाख ट्रॅक्टर युनिटस् देशात एकूण विक्री होत आहे. आता चांगल्या मान्सूनमुळे ट्रॅक्टर विक्रीला पुन्हा ‘अच्छे दिन’ येतील, असे चित्र आहे.
अहवालानुसार 2020-21 मध्ये ट्रॅक्टर विक्रीची एकूण वाढ दशकात सर्वाधिक होती. कोरोना संसर्ग भारताच्या ट्रॅक्टर उद्योगासाठी सर्वात मोठी संधी ठरली होती.2021 हे आर्थिक वर्ष केवळ ट्रॅक्टर उद्योगासाठीच नव्हे तर सर्व क्षेत्रांसाठी चढ-उतारांनी भरलेले होते. यावर्षी जगाला साथीच्या रोगाचा सामना करावा लागला, ज्याचा ट्रॅक्टरच्या विक्रीवर सुरुवातीला थेट परिणाम झाला. 2020 ते 2021 या आर्थिक वर्षातील पहिले दोन महिने कडक लॉकडाऊनमुळे ट्रॅक्टरची 80 टक्के विक्री कमी झाली होती. लॉकडाऊननंतर सर्व वाहन विक्री मंद गतीने पूर्वपदावर येत गेली. परंतु ट्रॅक्टर कंपन्यांच्या विक्रीने मोठी मजल मारली होती.
कोल्हापूरच्या फौंड्री उद्योगाला दिलासा
कोल्हापुरातील फौंड्री उद्योग आशिया खंडात अग्रणी आहे. देशभरातील ट्रॅक्टर निर्मिती कंपन्यांना कोल्हापुरातील फौंड्री उद्योगात पार्टस् तयार करुन पाठवले जातात. ट्रॅक्टर विक्रीत वाढ झाल्याने कोल्हापुरातील फौंड्री उद्योग कोरोना संसर्गातही तग धरू शकला. दरम्यान कच्च्या मालाच्या किंमती प्रचंड वाढल्याने याचाही फटका या उद्योगाला बसला. ट्रॅक्टरची उच्चांकी विक्री कोल्हापुरातील फौंड्री उद्योगाला दिलासा देणारी बाब आहे.
वर्ष ट्रॅक्टर्सची विक्री
2017-18 7,26,026
2018-19 7,84,930
2019-20 7,07,533
2020-21 8,99,683
2021-22 8,42,196
2022-23 9,44,000
Previous Articleगोव्यात 29, 30 मे रोजी पावसाची शक्यता
Next Article अंटार्टिका संशोधनात अनेकांना संधी









