वार्ताहर /उचगाव
बेळगाव-वेंगुर्ले मार्गावरील मिलिटरी गणेशमंदिर, अरगन तलावनजीकच्या गतिरोधक आणि वळणामुळे गवताने भरलेला ट्रॅक्टर आकस्मिक रस्त्यावर कलंडला. यावेळी रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी प्रसंगावधान राखल्यानेच ते बालबाल बचावले सदर घटना सोमवारी सकाळी 11 च्या सुमारास घडली. गणेश मंदिराच्या शेजारी रस्त्यावर वळण असल्याने तसेच याच वळणावर गतिरोधक असल्याने या ठिकाणी अशी वाहने कलंडून मोठे अपघात घडत आहेत. दि. 14 डिसेंबर 2023 रोजी याच ठिकाणी उसाने भरलेला ट्रॅक कलंडून मोटारसायकलस्वारासह दोन व्यक्ती सापडल्या होत्या. मात्र त्यांना तातडीने बाहेर काढल्याने तेही बालबाल बचावले. गणेश मंदिराच्या बाजूनी असलेल्या संरक्षण भिंतीलाही उसाच्या जोरदार आदळल्याने तडे गेले होते. तरी सार्वजनिक बांधकाम खात्याने सदर वळण काढून या ठिकाणच्या रस्त्याची दुऊस्ती करावी आणि होणारे अपघात टाळावेत, अशी मागणी प्रवासी आणि नागरिकांतून करण्यात येत आहे. यासाठी तातडीने यावर उपाययोजना कराव्यात आणि घडणारे मोठे अपघात टाळावेत, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे









