ऑनलाईन टीम / तरुण भारत :
छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर ट्रॅक्टरमध्ये भरलेली मोठय़ा प्रमाणावर स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी 10 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. तेलंगणा पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली.
मुलाकानापल्ली आणि दुमुगुडेम मंडल येथे नक्षलवादी संघटनेचे सदस्य मोठय़ा प्रमाणात स्फोटके घेऊन आल्याची माहिती तेलंगणा पोलिसांना मिळाली. त्यानुसार भद्रादी कोत्तागुडेम पोलिसांनी दुमुगुडेम पोलीस आणि सीआरपीएफच्या 141 व्या बटालियनच्या जवानांची एक टीम तयार केली. या टीमने मुलाकानापल्ली आणि दुमुगुडेम मंडल परिसरातील गावे आणि त्यालगतच्या जंगलात शोधमोहीम सुरू केली. या गावाजवळ 10 संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता एका ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये मोठय़ा प्रमाणात स्फोटकं आणल्याचे त्यांनी कबुल केले. त्यानंतर स्फोटकांनी भरलेला ट्रॅक्टर जप्त करण्यात आला.
याप्रकरणी जवानांनी 10 नक्षलवाद्यांना अटक केली आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात स्फोटके एका बडय़ा माओवाद्यांकडे पाठवली जाणार होती. त्याचा वापर छत्तीसगड किंवा तेलंगणातील हल्ल्यासाठी करण्यात येणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.









