अडीच लाखाचे ट्रॅक्टर इंजीन जप्त
प्रतिनिधी / बेळगाव
ट्रॅक्टर चोरीप्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. हुक्केरी पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांच्याजवळून अडीच लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर इंजीन जप्त करण्यात आले आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी गुरुवारी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. शिवानंद यल्लाप्पा करीकट्टी (वय 22) मूळचा राहणार जागनूर, ता. चिकोडी, सध्या राहणार पामलदिन्नी, ता. गोकाक असे त्याचे नाव आहे. एका अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी अटक केली आहे.
दि. 18 एप्रिल 2023 रोजी हुक्केरी तालुक्यातील गौडवाड येथून ट्रॅक्टरची चोरी करण्यात आली होती. रायबाग पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातही एक ट्रॅक्टर चोरीची घटना घडली होती. या चोरी प्रकरणांचा तपास करताना हुक्केरी पोलिसांनी शिवानंद व एका अल्पवयीन मुलाला अटक करून ट्रॅक्टर इंजीन जप्त केले आहे. हुक्केरीचे पोलीस निरीक्षक महम्मदरफिक तहसीलदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. चोरीनंतर ट्रॅक्टर इंजीन पामलदिन्नी, ता. गोकाक येथे लपवून ठेवण्यात आले होते. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन इंजीन जप्त केले आहे. या जोडगोळीने आणखी कोठे चोरी केली आहे का? याचा तपास करण्यात येत असल्याचे पोलीसप्रमुखांनी सांगितले.









