वाठार किरोली :
शिरंबे (ता. कोरेगाव) येथे रहिमतपूर–कोरेगाव रस्त्यावर रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर ट्रॉलीतील उसाच्या मोळ्या पडून ट्रॅक्टर चालक अविनाश हनुमंत कुंभार (वय 21, रा. बोरडा, ता. कळंब, जि. धाराशिव, सध्या रा. सुर्ली ता. कोरेगाव) याचा मृत्यू झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पांडुरंग भगवान कदम (रा. सुर्ली, ता. कोरेगाव) यांच्या मालकीचा ट्रॅक्टर मच्छिंद्र हरिभाऊ कुंभार यांनी उसाच्या एका खेपेसाठी मागून नेला होता. उसाची खेप घेऊन जात असताना रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास शिरंबे गावाच्या हद्दीत रहिमतपूर–कोरेगाव रस्त्यावर उसाच्या मोळ्या ट्रॅक्टरवर पडून अपघात झाला. यामध्ये ट्रॅक्टर चालक अविनाश कुंभार याचा मृत्यू झाला. याबाबत पांडुरंग कदम यांनी रहिमतपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.








