2000 वर्षे जुन्या शहराचा लागला शोध
जगातील सर्वात रहस्यमय संस्कृतींपैकी एक माया संस्कृती कशामुळे काळाच्या उदरात गडप झाली याचा खुलासा अद्याप झालेला नाही. आता दक्षिण अमेरिकन देश ग्वाटेमालामध्ये माया संस्कृतीशी निगडित एका मोठय़ा रहस्याचा खुलासा झाला आहे. माया संस्कृतीचे लोक परस्परांपासून दूर वास्तव्य करायचे असे आतापर्यंत मानले जात होते. ग्वाटेमालाच्या वर्षावनांमध्ये 2 हजार वर्षे जुने शहर, नागरी वस्ती आणि गावांचा शोध लागला आहे. यातून माया संस्कृतीचे लोक अत्यंत घनदाट लोकवस्तीत आणि संघटित समाजात राहायचे असे दिसून आले आहे.
पुरातत्वतज्ञांनी सुमारे 1000 माया संस्कृतीच्या वस्त्यांच्या महत्त्वपूर्ण अवशेषांचा शोध लावला आहे. या वस्त्यांचे अवशेशा वर्षावनांखाली लपलेले होते. संशोधकांनी 650 चौरस मैलाच्या भागात 964 पुरातत्व स्थळांचा शोध लावला आहे. या वस्त्या मिराडोर-कालकमुल क्रास्ट नदी खोऱयात सापडल्या आहेत. हा पूर्ण भाग मेक्सिकोला लागून आहे .यातील किमान 417 स्थळे तर 2 हजार वर्षे जुनी आहेत.
पिरॅमिड, कालवे अन् क्रीडामैदान
या पुरातत्व स्थळांच्या शोधासाठी वैज्ञानिकांनी एक विशेष तंत्रज्ञान एलआयडीएआरचा वापर केला. यात लेझर किरणांद्वारे सर्वेक्षण केले जाते. या सर्वेक्षणात अनेक असाधारण मार्गांचाही शोध लागला असून ते 100 मैलापर्यंत फैलावलेले होते अणि विविध वस्त्यांना जोडायचे. या वस्त्यांमध्ये स्मारक, पाणी जमा करण्याची सुविधा, उत्सवासाठी इमारत, पिरॅमिड, वास्तव्यसुविधा, कालवे इत्यादी आढळून आले आहेत. याचबरोबर संशोधकांना किमान 30 क्रीडामैदाने सापडली आहेत. माया संस्कृतीच्या काळात लोक एखाद्या प्रकारचा खेळ खेळायचे हे यातून स्पष्ट होते.
हे संशोधन इदाहो स्टेट युनिव्हर्सिटीचे पुरातत्व तज्ञ रिचर्ड डी. हानसेन यांच्या नेतृत्वाखाली पुरातत्व संशोधकांनी केले आहे. हे संशोधन एंशिएंट मेसोअमेरिका या नियतकालिकात प्रकाशित झाले आहे. असाधारण आर्थिक, राजकीय आणि सामाजिक शक्तीचे पुरावे मिळाले आहेत. या वस्त्या निर्माण करण्यासाठी हजारोंच्या संख्येत मजूर आणि कुशल कारागिरांचा वापर करण्यात आला होता असे संशोधन पथकाने म्हटले आहे.









