जनतेला सूचना, हरकतींसाठी 30 दिवसांची मुदत
पणजी : नगर नियोजन खात्याने सुमारे 1.30 लाख चौ.मी. जमिनीचे रुपांतर करण्याचा प्रस्ताव आखला असून त्यावर हरकती, सूचना मागविल्या आहेत. हे क्षेत्र नैसर्गिक असून ते सेटलमेंट झोनमध्ये रुपांतरीत करण्यासाठी एकूण 21 अर्ज खात्याकडे आले आहेत. त्यांचा विचार करूनच वरील जमिनीचे रुपांतर करण्याचा खात्याचा स्पष्ट इरादा आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत सुमारे 27,000 चौ.मी. ऑर्चिड जमिनीचे रुपांतर करण्यात आले असल्याची माहिती खात्यातील सूत्रांनी दिली. यासाठी 18 जणांचे प्रस्ताव आले होते. हैदराबाद येथील गंगा रेड्डी साधनसुविधा प्रा. लि. या कंपनीने मोरजी पेडणे येथील सुमारे 12000 चौ. मी. जमिनीचे सेटलमेंटमध्ये रुपांतर करण्यासाठी अर्ज केला होता. त्यास खात्याने 39(अ) या कलमांतर्गत मंजुरी दिली आहे. तत्पूर्वी ज्या 18 अर्जांसंदर्भात आक्षेप, सूचना मागविल्या होत्या, त्यांचा विचार करून ती जमीन रुपांतरीत करण्यात आली आहे. नाकेरी-केपे येथील मोठी जमीन 21 अर्जात समाविष्ट आहे. ते सर्व अर्ज खात्यामध्ये प्रस्तावासह तपासणीसाठी जनतेला खुले ठेवण्यात आले असून लोकांनी त्याची पाहणी करून आपापली मते लेखी सादर करावीत, अशी नोटीस खात्यातर्फे जारी करण्यात आली आहे. एकूण 30 दिवसांची मुदत त्यासाठी देण्यात आली आहे.









