वृत्तसंस्था /नवी दिल्ली
एमपीव्ही गटात ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी टोयोटाने भारतात आपली नवी रुमियन ही कार सादर केली आहे. सदरची गाडीची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नसून तज्ञांच्या मते या गाडीची किंमत 10 लाख रुपयांच्या घरात राहू शकते. मारुतीच्या अर्टिगाच्या धर्तीवर टोयोटाने आपली नवी गाडी बाजारात उतरवली आहे. या गाडीच्या इंटिरीअरमध्ये इर्टिगाच्या तुलनेत काहीसे बदल केले असल्याचे समजत असून बाह्या डिझाइनमध्ये बंपरसह ड्युअल टोन अलॉय व्हील, फॉग लॅम्प सराऊंडचा समावेश आहे. अंतर्गत मांडणीत ब्लॅक आऊट डॅशबोर्ड दिला असून 7 जण बसतील अशी व्यवस्था कारमध्ये असणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. 1.5 लीटर नॅचुरली अस्पिरेटेड पेट्रोल इंजिन यात असणार असून सीएनजीवरही ही गाडी धावू शकणार आहे.
एमपीव्ही गटातली चौथी कार
टोयोटाची ही नवी रुमियन कार एमपीव्ही गटातील चौथी असून बाजारात यशस्वीपणे गाडीचे सादरीकरण करण्यात आले आहे. इनोव्हा क्रिस्टा, इनोव्हा हायक्रॉस व वेलफायर या एमपीव्ही गटातील कंपनीच्या गाड्या याआधी बाजारात उतरवण्यात आल्या आहेत. टोयोटा मारुती सुझुकीसोबत एकत्रित भागीदारीतून बाजारात अशा मॉडेल्स उतरवत आहे.









