सिस्टममधील त्रुटीमुळे काम थांबविले
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिग्गज कार उत्पादक कंपनी टोयोटाने जपानमधील सर्व 14 असेंब्ली प्लांटमधील उत्पादन थांबवले आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या मते, कंपनीच्या प्रवक्त्याने मंगळवारी सांगितले की, असेंबली प्लांटमधील सुरु असलेले काम तेथील सिस्टममधील त्रुटीमुळे थांबवण्यात आले आहे.
उत्पादन कमांड सिस्टममधील त्रुटींमुळे निर्मिती प्रक्रियेत अडथळे जाणवत आहेत. त्यामागील कारणांचा शोध सुरू असल्याचे ते म्हणाले आहेत. सायबर हल्ल्यामुळे हा गोंधळ झाल्याची भीती मीडिया रिपोर्टमध्ये व्यक्त केली जात आहे. मात्र, कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, याला सायबर हल्ले कारणीभूत आहेत यावर आम्ही सध्यातरी विश्वास ठेवत नाही.
रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, कंपनीने प्रथम मंगळवारी सकाळी 12 प्लांटमध्ये उत्पादन थांबवले आणि दुपारपर्यंत 2 प्लांटमध्ये काम थांबवले. टोयोटाच्या जागतिक उत्पादनापैकी एक तृतीयांश उत्पादन ही प्लांटस् करतात.
गेल्या वर्षीही प्लांट बंद
याआधी, टोयोटाला फेब्रुवारी 2022 मध्ये देशांतर्गत बाजारपेठेतील सर्व प्लांट बंद करावे लागले होते. त्यानंतर त्यांच्या एका पुरवठादारावर रॅन्समवेअर हल्ला झाला व त्यावेळी कंपनीला नंतर हे काम सुरू होण्यास अनेक दिवस लागले. त्यावेळी उत्पादनावर 5 टक्के परिणाम झाला.









