251 जणांची प्रकृती बिघडली ः लोकांना घरातच थांबण्याचे आवाहन
अकाबा
जॉर्डनच्या अकाबा बंदरावर एका टँकरमधून विषारी वायूची गळती झाल्याने 10 जणांचा मृत्यू झाला तर 251 जण जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री उशिरा बंदरावर एक टँकर क्लोरिन गॅसची वाहतूक करत होता. क्रेननजीक पोहोचताच या टँकरमध्ये स्फोट झाल्याने 10 जणांना जीव गमवावा लागला. घटनेनंतर लोक जीव वाचविण्यासाठी पळताना दिसून आले.
पुढील आदेशापर्यंत स्वतःच्या घरातच थांबावे असे आवाहन शहरातील रहिवाशांना करत आहोत. त्रास अधिक होत असल्यास घरांचे दरवाजे आणि खिडक्या पूर्णपणे बंद ठेवा असे आवाहन लोकांना करत असल्याचे अकाबा आरोग्य विभागाचे प्रमुख जमाल ओबेदियात यांनी म्हटले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो असे त्यांनी नमूद केले आहे.
ही दुर्घटना कर्मचाऱयांच्या चुकीमुळे घडली आहे. सिलिंडर शिपवर लोड केला जात असताना मोठा स्फोट झाला. त्यानंतर सिलिंडर जमिनीवर कोसळला. या बंदरावर या घटनेवेळी सुमारे 25 टन क्लोरिन गॅसचा साठा होता.
घटनास्थळी त्वरित फील्ड हॉस्पिटल्स तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. अकाबाची लोकसंख्या सुमारे 1 लाख 88 हजार आहे. तेथून काही अतंरावर इस्रायलचे ईलत हे शहर आहे. दोन्ही शहरे रस्त्यांद्वारे देखील जोडली गेलेली आहेत. आम्ही स्थितीवर नियंत्रण मिळविले असले तरीही काही जखमींची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे जॉर्डनचे माहितीमंत्री फैसल अल सुबुल यांनी म्हटले आहे.









