इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष जगाला तिसऱ्या महायुद्धाकडे खेचत आहे का, असा प्रश्न गेल्या काही दिवसात विचारला जाऊ लागला आहे. या संघर्षापूर्वी वर्षभराहून अधिक काळ रशिया आणि युक्रेन यांच्यात यापेक्षाही मोठे युद्ध झाले. ते अद्यापही संपलेले नाही. पण त्या युद्धाच्या कालावधीत हा प्रश्न जितक्या तीव्रतेने पुढे आला नव्हता, तितका तो आता भेडसावू लागल्याचे दिसून येते. इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षाला 13 दिवस होऊन गेले. पण तो थांबण्याचे नाव घेत नाही. उलट दिवसेंदिवस त्याची तीव्रता वाढत आहे. या संघर्षाने जगाची दोन तटांमध्ये विभागणी केली आहे. एका बाजूला इस्रायल, अमेरिका आणि रशिया वगळता इतर युरोपियन देश आणि दुसऱ्या बाजूला हमासला पाठिंबा देणारे मुस्लीम देश आणि त्यांचे उघड नाही, तरी अप्रत्यक्ष समर्थन करणारे चीन आणि रशिया अशी ही विभागणी आहे. अरब देशांपैकी बहारिन आणि संयुक्त अरब अमिरात यांनी इस्रायलच्या बाजूने झुकणारी तटस्थ भूमिका घेतल्याचेही पहावयास मिळत आहे. तर भारताची भूमिका प्रामुख्याने दहशतवादाच्या विरोधात आहे. युव्रेन-रशिया युद्धात अशी जगाची विभागणी इतक्या स्पष्टपणे झाली नव्हती. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात मात्र जगाची मित्रराष्ट्रे आणि शत्रूराष्ट्रे अशी ठळक विभागणी झालेली होती. त्यामुळे इस्रायल आणि हमास यांच्यातील हा संघर्ष जगाला तिसऱ्या महायुद्धाकडे घेऊन जाणार का, अशी शंका अनेक तज्ञांना येत आहे. जगाच्या एका अत्यंत छोट्या भागात होत असलेला हा संघर्ष आणखी विक्राळ रुप धारण करु शकतो, हे मात्र निश्चित. या संघर्षात घडलेल्या अनेक घटना याची साक्ष देतात. हा युद्धस्वरुप संघर्ष ऐन भरात आलेला असताना अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडेन त्यांना धोका होण्याची शक्यता असतानाही इस्रायलला येऊन गेले. ब्रिटनचे पंतप्रधान सुनक यांनीही भेट दिली आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही येण्याची शक्यता आहे. अशा तीन महासत्तांमध्ये प्रमुख संघर्ष पेटलेला असताना येऊन जाणे, यातून या संघर्षाचे गांभीर्य लक्षात येते. हा संघर्ष एक देश आणि एक दहशतवादी संघटना यांच्यातील आहे, असे वरवर दिसत असले तरी साऱ्या महासत्तांची प्रतिष्ठा आणि तुलनात्मक सामरिक क्षमताही यात पणाला लागल्याचे स्पष्ट होते. ही स्थिती निर्माण करण्याची जबाबदारी अर्थातच पूर्णपणे हमास या दहशतवादी संघटनेवरच आहे. कारण, या संघटनेला इस्रायलवर अत्यंत क्रूर आणि अत्याचारी हल्ला करण्याचे सध्या काहीही कारण नव्हते. इस्रायल-अरब आघाडीवर बऱ्यापैकी शांतता असल्याचे पहावयास मिळत होते. सौदी अरेबिया आणि इस्रायल यांच्यातून पूर्वी विस्तव जात नव्हता. पण अलीकडच्या काळात त्यांचे संबंध सुधारतील असे वातावरण दिसत होते. कदाचित, याच कारणामुळे हमासला पुढे करुन इराणने हे वातावरण बिघडविले, असाही आरोप होत आहे. या सर्व घडामोडींमधील चीनची भूमिका अद्याप अस्पष्ट असली तरी आतून ती नसेलच, याची शाश्वती देता येत नाही. याच संघर्षात नुकत्याच घडलेल्या एका प्रसंगाने जगाची ही विभागणी अधिक स्पष्ट झाली आहे. गाझापट्टीच्या दक्षिण भागातील एका ऐतिहासिक महत्त्व असलेल्या रुग्णालयात प्रचंड स्फोट होऊन किमान 500 लोक ठार झाले आहेत. याची जबाबदारी लगोलग हमासने इस्रायलवर टाकून स्वत:साठी सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला. तथापि, इस्रायलने त्वरित यात हल्ल्यात आपला हात नसल्याचे पुराव्यानिशी सिद्ध केले. यातून ‘इस्लामी जेहाद’ नामक आणखी एका दहशतवादी संघटनेचे नाव समोर आले. या संघटनेने इस्रायलवर अग्निबाणांचा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण त्यातील एक अग्निबाण नेम चुकून या रुग्णालयावर पडला. याच रुग्णालयात हमासने आपल्या स्फोटकांचा साठा लपविला होता. कारण त्यावर इस्रायल हल्ला करणार नाही, अशी हमासची खात्री होती. पण तो साठा या अग्निबाणामुळे धडाधडा पेटला आणि त्या भीषण स्फोटात हे अल अहली अरेबिया नावाचे 1875 च्या आसपास स्थापन करण्यात आलेले रुग्णालय पूर्ण भस्मसात झाले. ही घटना घडली, त्यावेळी त्यात किमान 4 हजार लोकांना आश्रय देण्यात आला होता, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे मृतांची संख्या कदाचित एक हजाराहून अधिक असू शकेल अशीही माहिती बाहेर येत आहे. या सर्व घटनाक्रमाची पडताळणी अद्याप व्हायची असली तरी, इस्रायलयने तो स्फोट घडविला नाही, हे अमेरिकेनेसुद्धा मान्य केले आहे. तसेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत या संघर्षाच्या संदर्भात जो प्रस्ताव मांडण्यात आला होता, त्यातही स्फोट घडविण्याचा आरोप इस्रायलवर करण्यात आला नव्हता. यातून इस्रायलचे निर्दोषत्व जगातील बहुतेक देशांना पटले आहे, असेच दिसून येते. पण काही इस्लामी देशांनी मात्र, इस्रायल विरोधात याच स्फोटाच्या आधारावर शाब्दिक आग ओकण्यास प्रारंभ केला असून इराणने तर जगातील सर्व मुस्लीमांना एक होण्याची प्रक्षोभक हाक दिली आहे. यावरुन असा निष्कर्ष निघतो की काहीही करुन हा संघर्ष पेटताच रहावा, अशी दहशतवादी संघटना अणि त्यांना खतपाणी घालणारे काही धर्मांध देश यांची इच्छा आहे. ही त्यांची उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी ते बनावट किंवा खोट्या निमित्तांचाही उपयोग करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत, अशी स्थिती दिसून येते. त्यामुळेच हा संघर्ष तिसऱ्या महायुद्धाकडे जगाला घेऊन जाईल का, असा प्रश्न विचारला जात आहे. कदाचित, सर्व महासत्ता मिळून ही टोकाची स्थिती टाळण्यात यशस्वीही होतील. पण एक बाब मात्र निश्चित आहे की दहशतवादाचा आणि तो पोसणाऱ्या संघटनांचा पूर्ण नायनाट झाल्याखेरीज जगावरील तिसऱ्या महायुद्धाचे सावट दूर होणार नाही. अनेक दहशतवादी संघटनांना आणि काही देशांनाही इस्रायलचे अस्तित्वच नको आहे. त्यांचा लढा केवळ पॅलेस्टाईनींच्या न्याय्य अधिकारांसाठी नसून ते केवळ वातावरण पेटते ठेवण्याचे निमित्त आहे. त्यांचा मूळ हेतू इस्रायलचे अस्तित्व पुसून टाकण्याचा आहे, असे स्पष्टपणे दिसते. पण इस्रायल हा देश बलवान आणि निश्चयी असून तो हे घडू देईल हे अशक्य आहे. त्यामुळे पश्चिम आशियातील हा संघर्ष बराच काळ पेटताच राहील, अशी शक्यता असून त्यातून तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडू नये यासाठी सर्व संबंधित देशांना पुष्कळच सावधानता बाळगावी लागणार हे उघड आहे.
Previous Articleस्पोर्ट्स mania
Next Article शारदीय नवरात्रातील सरस्वती
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








