काँग्रेसचे अध्यक्षपद गांधीतर नेत्याच्या हाती पडण्याच्या दृष्टीने सध्या पक्षांतर्गत हालचाली सुरू असल्याचे दिसत आहे. या पदावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निवडीची शक्यता असून, त्यावर शिक्कामोर्तब होणार का, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल. काँग्रेसमधील पक्षांतर्गत निवडणुका पार पाडल्या आहेत. आता महत्त्वाची म्हणजेच पक्षाध्यक्षपदाची निवडणूक होईल. 21 सप्टेंबरपर्यंत नवा पक्षाध्यक्ष निवडला जाईल. या निवडणुकीसाठीची प्रक्रिया याआधीच सुरु करण्यात आली असून, या निवडणुकीसंदर्भात येत्या रविवारी कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली आहे. ही बैठक सर्वार्थाने महत्त्वाची असेल. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी तसेच प्रियांका व राहुल गांधी हे सध्या परदेशात आहेत. त्यामुळे या बैठकीत ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच सहभागी होतील, असे सांगण्यात येते. राहुल गांधी हे पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास अद्यापही राजी नाहीत, अशी स्थिती आहे. काँग्रेसचा नवा अध्यक्ष हा गांधीतर असावा, अशी ठाम भूमिका ते घेताना दिसतात. स्वाभाविकच त्यांनी पक्षाध्यक्षपदाकरिता अधिकृत नकार कळविला, तर गांधीतर नेत्यासच या पदाच्या निवडणुकीत उतरावे लागेल. अध्यक्षपदाकरिता मल्लिकार्जुन खर्गे, कुमार शैलजा, मुकुल वासनिक अशी काही नावे चर्चेत असली, तरी आज तरी अशोक गेहलोत यांचेच नाव आघाडीवर असल्याचे दिसून येते. हे पाहता त्यांची निवड ही औपचारिकता मानली जाते. मागच्या 24 वर्षांत गांधीतर नेत्याकडे पक्षाध्यक्षपद सोपविण्यात आलेले नाही. 1996 ते 1998 यादरम्यान सीताराम केसरी यांच्याकडे पक्षाध्यक्षपदाची धुरा होती. किंबहुना क्षीण काँग्रेसमध्ये प्राण फुंकण्यासाठी पुन्हा गांधी घराण्यानेच नेतृत्व स्वीकारावे, याकरिता सोनिया गांधी यांना गळ घातली गेली. त्यातून सोनिया यांनी होय नाही म्हणत 1998 मध्ये काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारले. 2017 ते 19 हा राहुल गांधी यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीचा अपवाद वगळता मागची दोन दशके सोनिया यांच्याकडेच पक्षाचे नेतृत्व आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांची प्रकृती तितकीशी ठीक नाही. त्यामुळे पक्षसंघटनेकरिता पुरेसा वेळ देणे त्यांना जमलेले नाही. तर राहुल हेही नेतृत्वाकरिता उत्सुक नसल्याचे वारंवार अधोरेखित झालेले आहे. मध्येच जोमाने सक्रिय होणे, आक्रमक होत दौरे करणे अन् त्याच गतीने धूमकेतूप्रमाणे अचानक गायब होणे, अशा गुणवैशिष्टय़ांमुळे राहुल आपल्या राजकीय जीवनात सातत्य दाखवू शकलेले नाहीत. डॉ. मनमोहनसिंह यांच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी असतानाही राहुल यांनी मंत्रिपदापासून दूर राहणेच पसंत केले. त्याअर्थी नेतृत्वाबाबत ते गंभीर आहेत का, असा प्रश्न निर्माण होणे, तसे स्वाभाविकच ठरते. या पार्श्वभूमीवर मागच्या काही वर्षांपासून पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष हवा, असा धोशा पक्षातील काही नेत्यांकडून लावला जात आहे. जी 23 गटातील नेत्यांनीही याबाबत वेळोवेळी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. लोकांना भेटणारा, आघाडीवर येऊन नेतृत्व करणारा व पक्षाकरिता पूर्णवेळ उपलब्ध असलेला अध्यक्ष असावा, अशी मागणी या मंडळींनी केली होती. गांधी घराण्यातील व्यक्ती अध्यक्ष नसावी, अशीही यातील अनेकांची इच्छा दिसते. त्यातूनच गेहलोत यांचे नाव पुढे आले असावे. दुसऱया बाजूला भाजपाकडून काँग्रेसमधील घराणेशाहीला लक्ष्य करण्यात येत आहे. गांधीतर नेत्याला अध्यक्षपद देऊन या टीकेला उत्तर देण्याची संधी या माध्यमातून काँग्रेसकडे चालून आली आहे, ते ती साधणार का, हे लवकरच कळेल. आता गेहलोतच का, असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यालाही अनेक पदर दिसतात. मुळात अशोक गेहलोत हे काँग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जातात. इंदिरा गांधी, राजीव गांधी व पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी सक्षमपणे काम केले आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी लक्षणीय कामगिरी केल्याचे पहायला मिळते. 1998 ते 2003 या काळातील त्यांची पहिली मुख्यमंत्रिपदाची टर्म विशेष उल्लेखनीय म्हणावी लागेल. दुष्काळाच्या आपत्तीशी सामना करतानाच वेगवेगळय़ा आघाडय़ांवर त्यांनी केलेले काम आजही नावाजले जाते. त्यानंतरची 2008 ते 13 व 2018 पासूनची तिसरी टर्मही अशीच बहुचर्चित होय. राजस्थानातील गेहलोत सरकार पाडण्याचे अनेक प्रयत्न झाले. सचिन पायलट यांच्या माध्यमातून त्यांच्या राजवटीला धक्का देण्याचा डावही जवळपास यशस्वी झाला होता, असे म्हणतात. परंतु, या बंडाळय़ा मोडून काढत मुत्सद्दी व मुरब्बी गेहलोत सर्वांना पुरून उरले. राजकारणातील छक्के पंजे या नेत्याला पुरते ठाऊक आहेत. त्या बळावरच पायलट यांचे विमान त्यांनी आजवर वर उडू दिलेले नाही. त्यामुळे अशा नेत्याकडेच कमान सोपविण्याचा पक्षश्रेष्ठींचा मनसुबा असावा. अर्थात बंडखोर जी 23 गटातील नेते त्यांनाही आव्हान देण्याची शक्यता नाकारता येत नाही. तथापि, गेहलोत हे लोकनेते आहेत. लोकांमध्ये जाऊन काम करण्याचा त्यांना अनुभव आहे. ते निव्वळ दरबारी राजकारणी नव्हेत. पक्षसंघटना महासचिव म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हे बघता ते या पदाला न्याय देऊ शकतात. मुख्यमंत्रिपदाचा त्याग करून हे पद स्वीकारण्याची तयारी त्यांनी अद्याप दर्शविल्याचे वृत्त नाही. तरी सोनिया गांधी यांनी त्यांच्याशी केलेली चर्चा फळाला येऊ शकते, असे म्हणण्यास वाव आहे. तसे झाल्यास त्यांच्या जागी सचिन पायलट यांच्याकडे राजस्थानचे मुख्यमंत्रिपद सोपविले जाऊ शकेल. मागच्या आठ वर्षांचा काळ हा काँग्रेससाठी शोकपर्वापेक्षा कमी नाही. लोकसभेतील पक्षाच्या जागाही 50 च्या खाली आल्या आहेत. गेहलोतांच्या गळय़ात पक्षाध्यक्षपदाची माळ पडली, तर ते पक्षाला गतवैभव प्राप्त करून देतील का, याकडे देशाचे लक्ष असेल.
Previous Articleलोणंद शहरात आढळल्या बनावट नोटा
Next Article आक्रमक विदेशी वनस्पतींचे संकट
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








