जगभरातील भांडवली बाजार पत्यांचे बंगले ढासळावेत तसं ढासळत आहेत. भारतीय शेअर बाजाराचा सेन्सेक्स विक्रमी रोडावला आहे. रोज गटांगळ्या खात आहे. गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. लाखाचे बारा हजार होणे म्हणजे काय यांची अनूभूती येत आहे. ज्यांचा पोर्टफोलिओ 10 लाख रुपयांचा होता तो चार लाख रुपयांवर आला आहे. पुढे काय वाढून ठेवले आहे याचा कोणालाच काही अंदाज उरलेला नाही. अमेरिकेने कॅनडा व मेक्सिकोच्या उत्पादनावर 25 टक्के आयात शुल्क लागू केले आहे, अमेरिकेने चीनवरीलही आयात शुल्क 10 टक्क्यावरुन 20 टक्के केले आहे. अमेरिकेचे पुन्हा नव्याने अध्यक्ष झालेले डोनाल्ड ट्रम्प उलट सुलट निर्णय घेत आहेत साहजिकच जगभरच्या अर्यव्यवस्थांना हादरे बसत आहेत आणि विविध देशांकडून प्रतिक्रियात्मक निर्णय घेतले जात आहेत. ट्रम्प यांच्या घोषणेनंतर
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी पुढील 21 दिवसांत 155 अब्ज डॉलर अमेरिकन आयातीवर 25 टक्के शुल्क आकारणी सुरु केली आहे, ट्रम्प यांनी कॅनडातून आयात होणाऱ्या कच्चे तेल व विजपुरवठ्यावर आयात शुल्क वाढवलेले नाही, थोडक्यात अमेरिका आणि जग जशास तसे या भूमिकेत दिसून येत आहे याचा लगेचच परिणाम भांडवली बाजारावर झाला आहे. यांची परिणीती महागाई, मंदी, तस्करी याकडे वळणार हे वेगळे सांगायला नको. ट्रम्प यांनी पुन्हा सत्तारूढ होताच उलट सुलट निर्णय आणि धोरण स्पष्टता नाही, अशी चाल ठेवली आहे. रशिया-युक्रेन युद्धातही त्यांनी पीडित युक्रेनचीच मदत काढून घेतली आहे. भारतालाही त्यांनी धमकावले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिठी मारताना त्यांचा हेतू लपून राहिलेला नाही, ही मिठी शत्रूपूर्ण ठरणार कि स्नेहाची हे काळ ठरवेल, पण आपण आपली अर्थव्यवस्था सुदृढ करायची तर बदलत्या जागतिक स्थितीत आपल्या भूमिका बदलल्या पाहिजेत. आयात-निर्यात धोरणात बदल केले पाहिजेत. देशी विदेशी गुंतवणुकीला चालना दिली पाहिजे म्हटले, तर ही भारतासाठी संधी आहे. म्हटले तर संकट आहे आपण काय करणार, केव्हा करणार, देशी-विदेशी गुंतवणूकदारांना विश्वास देणार का, यावर सारे अवलंबून आहे. खरे तर गुंतवणूकदार आपली गुंतवणूक आधिक परतावा मिळावा म्हणूनच करत असतो. पण मोदी सरकारमधील अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडलेला अर्थसंकल्प गुंतवणूकदारांना पळवून लावणारा आहे. अर्थसंकल्पात शॉर्टटर्म गेन, लॉंगटर्म गेन वर जे कर बसवलेत ते असह्य ठरणारे आहेत. गुंतवणूकदारांना पळवून लावणारे आहेत. आमची अर्थव्यवस्था स्वशक्तीशाली आहे, असा तोरा त्यामागे दिसतो. स्वशक्तीशाली असलीच पाहिजे पण विदेशी गुंतवणुकदारांना दुखावले जाणार नाही यांची काळजी व धोरण गरजेचे आहे. आपला विकासदर थोडा वाढला असला तरी सात-आठ टक्के झालेला नाही. सहा साडेसहा टक्के राहील, असा अंदाज आहे त्यातून विदेशी गुंतवणूकीला मिळणारा परतावा, त्यावर बसणारे कर पहाता जगाच्या बाजारपेठेत चीनमधील गुंतवणूक आधिक फायद्याची ठरते आहे. चीनचा विकास दर कमी असला तरी त्यांच्या अर्थव्यवस्थेचा आकार भव्य आहे. विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन आहे, याचा परिणाम विदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतातील गुंतवणूक काढून चीनमध्ये करु लागले आहे. भारताने गुंतवणुकीला प्रोत्साहन आणि उत्पादन क्षमता वाढवून निर्यात वाढवली पाहिजे. एका रात्रीत हे होणार नाही, पण दिशा स्पष्ट असायला हवी. देशी गुंतवणूकदार आपली डिमॅट अकौंट पटापट बंद करत आहेत. एसआयपी बंद पडते आहे हे कशाचे निदर्शक आहे, मोदी, निर्मला सीतारमण आणि विदेश मंत्री जयशंकर, व्यापार मंत्री पियूष गोयल यांनी आर्थिक सल्लागाराची मदत घेवून तत्काळ भूमिका घेतली पाहिजे आणि गुंतवणूक व व्यापार यास चालना दिली पाहिजे. भारत ही जगातील सर्वात मोठी व्यापारपेठ आहे. जगातले सर्वाधिक युवा भारतात आहेत आणि भारत हे लोकशाही राष्ट्र आहे या तीन गोष्टी अर्थव्यवस्था उंचावण्यासाठी भक्कम पाया ठरु शकतात. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प वेगवेगळ्या खेळ्या करत राहणार. सध्या त्यांनी घेतलेले निर्णय भारतातील कृषी उत्पादने आणि ऑटो उद्योगाला मारक आहेत. पण भारताने ठरवले आणि निर्णय घेतले तर भारत अमेरिकेला काहीही निर्यात न करता जगाच्या पाठीवर अन्य देशांसोबत व्यापार लक्षणीय प्रमाणात वाढवू शकतो. केंद्रीय व्यापार मंत्री पीयूष गोयल अमेरिका दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्याचे फलित काय निघते हे बघावे लागणार आहे. पण ट्रम्प एप्रिल महिन्यापासून भारताला आयात शुल्काच्या कचाट्यात पकडण्यासाठी तयारी करत आहेत. ब्रिक्स देश आणि ब्रिटनसह पाश्चिमात्य देश यांच्याशी आपण नव्याने व्यापार करार केले तर ट्रम्प गेला तेल लावत, असे म्हणू शकतो. मोदी सरकारने प्राप्तिकर मर्यादा वाढविली आहे पण गुंतवणुकीस, भांडवली गुंतवणुकीस अद्याप म्हणावी तशी चालना मिळालेली नाही. वेळीच ती दिली पाहिजे व अर्थव्यवस्था सावरत वेगवान केली पाहिजे. जागतिक स्तरावर अमेरिकेकडून व्यापार युद्ध छेडले गेले आहे, गुजराती व्यापारी व्यापारात तरबेज असतात. देशावर गुजरात लॉबीचा प्रभाव आहे. मोदी, शहा, गोयल तरबेज आहेत. या व्यापारयुद्धात चित पडो वि पट भारत जिंकला पाहिजे. भारत ही जगातील मोठी शक्ती आहे. ती कमकुवत होणार नाही याची काळजी तर घेतलीच पाहिजे. सोबत त्वरेने निर्णय घेत युरोपीय देश आणि जगाच्या पाठीवरील अन्य देश यांना विश्वासात घेवून व्यापार वाढवला पाहिजे. आज घडीची तीच गरज आहे. तूर्त जागतिक व्यापार युद्ध छेडले गेले आहे आणि भारताला त्याचा लाभ उठवत रुपया मजबूत केला पाहिजे, जगाच्या बाजारपेठेत स्वत:च्या उत्पादन अन् सेवांचा दबदबा निर्माण करत, गुंतवणूकदारांना विश्वास दिला पाहिजे.








