अमेरिकेत नुकतेच पुन्हा सत्तेत आलेले डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांनी घेतलेले धडाकेबाज निर्णय यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा दोन्ही देशांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार होता. तसा तो ठरला आणि काही महत्त्वपूर्ण घोषणा त्यातून झाल्या. शिवाय काही बाबतीत मोदी यांच्या मर्यादाही उघड झाल्या. या चर्चेचे कौतुक काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनीही केले आहे. थरूर हे केवळ पारंपरिक भारतीय राजकारणी नसून संयुक्त राष्ट्राचे पूर्व सचिवही आहेत. त्यामुळे ते काय बोलतात हे जगासाठी महत्त्वाचे ठरते. मोदी आणि ट्रम्प यांनी एकत्र बसून व्यापार आणि शुल्काच्या प्रश्नावर गंभीर चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे, जो सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत संपेल. बेकायदेशीर स्थलांतरित भारतीयांच्या स्थलांतराच्या मुद्द्यावर फक्त एकाच गोष्टीची उणीव होती ती म्हणजे त्यांना परत कसे पाठवायचे? अन्यथा त्यांची भूमिका अगदी बरोबर होती. हे दिशाभूल झालेले तऊण आहेत ज्यांना बेकायदेशीरपणे स्थलांतर करण्यास प्रोत्साहित आणि प्रवृत्त केले गेले आहे. संरक्षणाच्या बाबतीत, अमेरिकेने आम्हाला एफ-35 स्टेल्थ विमाने विकण्याची वचनबद्धता खूप महत्त्वाची आहे, कारण ते एक अत्याधुनिक विमान आहे. दौऱ्याबद्दल आतापर्यंत मिळालेल्या माहितीने मी खूप उत्साहित आहे. पंतप्रधान मोदींच्या अमेरिका भेटीत, आम्हाला (भारताला) जे अपेक्षित होते ते सर्व मिळाले, फक्त भारतीय स्थलांतरितांना परत कसे पाठवायचे याचे आश्वासन मिळाले नाही…. थरूर यांची ही प्रतिक्रिया योग्य, संतुलित आणि अधिक सजगपणाने पाहणारी आहे. विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी मांडलेली भूमिका किंवा टीका ही त्यांच्या पदाला योग्य आहे. कारण सत्ता पक्षावर अंकुश ठेवण्याची त्यांची जबाबदारी आहे आणि अदानी लाच प्रकरणावर त्यांनी पंतप्रधान मोदी यांना घेरणे हे त्यांचे काम आहे. अर्थातच त्यामुळे ज्यांना सत्ता सोपवली आहे, त्यांनी अमेरिकेत जाऊन जे केले त्याचे महत्त्व काय ? त्यातील त्रुटी कोणत्या याचा साकल्याने विचार करणे आवश्यक ठरते. या दौऱ्यात दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा होणार याकडे दोन्ही देशांचेच नाही, तर सगळ्या जगाचे लक्ष होते. चर्चेमध्ये दोन्ही देशांमधील संरक्षण भागीदारीला अधिक व्यापक करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ट्रम्प म्हणाले. या वर्षापासून आम्ही भारताला अब्जावधी
डॉलर्सची लष्करी विक्री वाढवू, भारताला एफ-35 लढाऊ विमानांची विक्री केली जाईल, असेही ट्रम्प म्हणाले. एफ-35 ही जगातील सर्वात घातक आणि अत्याधुनिक लढाऊ विमाने असल्याचे मानले जाते. यामुळे भारत आता नाटो सहयोगी देश, इस्रायल आणि जपानच्या एका विशेष क्लबमध्ये सामील होईल. त्यामुळे त्यांना एफ-35 खरेदी करण्याची परवानगी असेल. हे लढाऊ विमान सुपरसॉनिक वेगाने उ•ाण करेल, ज्याची कोणालाही माहिती नसेल. इस्लामिक दहशतवादाविरोधात देखील भारत आणि अमेरिकेने कधी नव्हते याप्रमाणे एकमेकांबरोबर काम करायचा निर्णय घेतला आहे, असेही ट्रम्प म्हणाले. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड असलेल्या तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण अमेरिका करणार असल्याचेही ट्रम्प यांनी यावेळी सांगितले. जगातल्या सर्वात वाईट व्यक्तीचे भारताकडे प्रत्यार्पण केले जाणार असल्याचे जाहीर करताना आपल्याला आनंद होत असल्याचे ट्रम्प म्हणाले. राणा सध्या लॉस एंजेलिसमधील
मेट्रोपॉलिटन डिटेंशन सेंटरमध्ये कैदेत आहे. 2008 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य सूत्रधारांपैकी एक असलेल्या पाकिस्तानी अमेरिकन दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडलीशी त्याचे संबंध असल्याचे मानले जाते आहे. कायद्यानुसार कारवाई करण्यासाठी त्याला लवकरच भारताच्या स्वाधीन केले जाणार असल्याचे ट्रम्प म्हणाले आहेत. हे भारताचे यश आहे. याशिवाय ट्रम्प यांचा परस्पर टॅरिफ लावण्याचा निर्णय हा प्रत्यक्षात अमेरिकेत गुंतवणूक वाढावी आणि उत्पादन क्षेत्राला चालना देण्याच्या योजनेचा भाग आहे. त्यात ते तडजोड करणार नाहीत हे स्पष्ट झाले. त्याबाबतीत मोदींना अपेक्षित यश मिळाले नाही. घुसखोर भारतीय युवकांना परत घेऊन यावेच लागेल त्याकडे अमेरिका आता कानाडोळा करणार नाही आणि अदानी यांच्यावरील कारवाई देखील होणारच हे जवळपास स्पष्ट झाले आहे. ह्याबाबतीत अमेरिकी पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नामुळे मोदी यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. ही कारवाई झाली तर भारतात मोदी यांना अदानी या त्यांच्या सध्याच्या काळातील सर्वात जवळच्या उद्योगपतीवर कारवाई करण्यासाठी दबाव वाढणार आहे. ज्यामुळे त्या उद्योगाचा आर्थिक डोलारा डळमळीत होऊ शकतो. पण मोदी याबाबतीत फार काही करू शकणार नाहीत हे देखील या दौऱ्याने अगदी स्पष्ट केले आहे. या काही गोष्टींचे परिणाम अदानी यांच्या वर्चस्वाला, भारतीय भांडवली बाजार आणि मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांना भविष्यात भोगावे लागणार हे उघड झाले आहे. हे मुद्दे वगळता भारत आणि अमेरिकेतील चर्चा ही बऱ्याच अंशी सफल झाली म्हणता येते. दोन्ही नेत्यांनी पत्रकारांसमोर दिलेल्या निवेदनात, तेल, वायू, संरक्षण, टॅरिफ, तंत्रज्ञान आणि व्यापार या विविध पैलूंवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय व्यापार आणि संबंध मजबूत करण्यावर जोर दिला. दोघांनी लोकशाहीच्या समृद्धीसाठी एका मेगा पार्टनरशिपची गरज असल्याचे म्हटले. पंतप्रधान मोदी यांनी 2030 पर्यंत अमेरिकेबरोबर व्यापार दुप्पट करणार असल्याचे सांगितले. रशिया युक्रेन युद्ध आणि बांगलादेश यांच्या बाबतीत परस्परांना अडथळे ठरणारे मुद्दे दोन्ही देशांकडून पुढे आल्याचे दिसले नाहीत. अमेरिकेला आपले प्रभुत्व कायम राखायचे असल्याने रशिया, चीन यांना नजरेच्या टप्प्यात राखत भारतासारख्या देशांशी व्यवसाय वाढवायचा आहे. त्यातून ते पुढे जाण्याची संधी शोधत आहेत आणि भारत आपल्या संधींची वाट पाहतो आहे. अशावेळी ही मेगा पार्टनरशिपची वाटचाल दोघांचीही गरज आहे. परस्परांचे काही मुद्दे मान्य करून ट्रम्प यांच्या कलाने भारताला ही वाटचाल करायची आहे.








