वार्ताहर /नंदगड
नंदगड येथील जलाशय पूर्ण क्षमतेने भरला आहे. गेल्या काही दिवसापासून कित्येक क्मयुसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. हे पाणी तट्टी नाल्यातून बिडी, गस्टोळी परिसरात जाते. गेले काही दिवस शाळांना सुटी असल्याने पालकांसह मुले जलाशयातून विसर्ग होणारे पाणी आणि निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी व त्यात अंघोळ करण्यासाठी मोठ्याप्रमाणात गर्दी करीत आहेत. त्यातच शनिवार व रविवारी सुटीचा दिवस असल्याने तब्बल एक हजारहून अधिक नागरिक या जलाशय परिसरात आनंद लुटण्याचा आनंद घेत आहेत.
नंदगड, खानापूर, बेळगाव, बिडी, परिसरातील अनेकजण आपल्या कुटुंबीयासमवेत येथे आले होते. जलाशयाचा परिसर तसेच कित्येक क्मयुसेक पाण्याचा होणारा विसर्ग, त्यात आनंद लुटणारे मुले सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत गर्दी होत आहे. सध्या नंदगडपासून जलाशयापर्यंत चारचाकी वाहन जात असल्याने येथे येणाऱ्या जाणाऱ्यांची चांगली सोय झाली. रविवारी दुपारनंतर पाऊस ओसरल्याने पाणी विसर्ग होण्याचे पाण्याचे प्रमाण थोडे कमी झाले होते.
नंदगड गावापासून तीन किलोमीटर अंतरावर हा जलाशय आहे. जलाशयाच्या बांदा जवळून आनंदगड किल्ल्याला जाण्यासाठी वाट आहे. आनंदगड किल्ला व दुर्गादेवी दर्शनासाठी जाणारे अनेक भाविक या रस्त्यावरून जातात. तर काहीजण जलाशयाच्या बांधावरून जातात. त्यामुळे नंदगड व परिसरातील जनतेला जलाशयाचा नेहमीच संपर्क येतो. जलाशयाचे अतिरिक्त पाणी जाण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या जलाशयात अतिरिक्त पाणी झाल्याने पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे हा जलाशय पाहण्यासाठी नंदगड व परिसरातील लोक गेल्या काही दिवसापासून रोज येत आहेत. पाऊस ओसरल्यानंतर मात्र यातून होणारा पाण्याचा विसर्ग थांबणार आहे. बेळगाव जिह्यातील सर्व धबधब्यांना जाण्यासाठी बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला असला तरी आता पर्यटकांनी नंदगडच्या जलाशयाकडे आपला मोर्चा वळविला आहे. त्यामुळे गेले चार-पाच दिवस गर्दी होताना दिसत आहे.









