देवस्थानचे पावित्र्य धोक्यात : वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून हुल्लडबाजी-दंगामस्तीचे दिवसेंदिवस वाढते प्रकार
वार्ताहर/कणकुंबी
कणकुंबी भागातील वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून हुल्लडबाजी आणि दंगामस्ती करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून कणकुंबी येथील श्री माउली देवीच्या परिसरातील पावित्र्य धोक्यात येत आहे. मलप्रभा तीर्थकुंड आणि चिगुळे येथील पाण्याची तळी पर्यटकांनी लक्ष बनवले आहे. कणकुंबी श्री माउली देवस्थानच्या परिसरात तीन-चार तीर्थकुंड आहेत. या जलकुंडातील पाणी विविध सणांच्या वेळी देवीला अभिषेक घालण्यासाठी वापरतात. यापैकी रामेश्वर मंदिराला लागून असलेल्या तसेच श्री माउली देवी मंदिराला लागून असलेल्या जलकुंडात पर्यटकांना जाता येत नाही. परंतु नदीच्या पात्रात या पवित्रस्थळी असलेले मलप्रभा तीर्थकुंड हे केवळ एक जलकुंड नाही,
तर कणकुंबी देवीच्या धार्मिक कार्यातील आध्यात्मिक ओळख आहे. हे ठिकाण वर्षानुवर्षे भक्तांच्या श्रद्धेचा, भक्तीभावाचा आणि मनशांतीचा केंद्रबिंदू ठरलेले आहे. सदर मलप्रभा तीर्थकुंडात देवीच्या वार्षिक उत्सवात देवीला स्नान घातले जाते. तसेच इतर धार्मिक विधी पार पडतात. परंतु वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून सदर जलकुंडात अंघोळ करण्यासाठी तरुणांची रीघ लागत आहे. अंघोळ करण्याबरोबरच दंगामस्ती करणे, पाण्यात उड्या मारणे, प्लास्टिक किंवा इतर केरकचरा, दारूच्या बाटल्या टाकणे असे प्रकार घडत असल्याने गावकरी संतप्त झाले आहेत. ग्रामस्थांनी हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांना समजावण्याचा प्रयत्न केला असता पर्यटकांकडून अरेरावी करण्यात येत आहे. यासाठी पोलीस प्रशासनाने या हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी कणकुंबी गावातील नागरिकांनी केली आहे.
तीर्थकुंड आणि मलप्रभा नदी आध्यात्मिक वारसा
वाढत्या सोशल मिडियाच्या ट्रेण्ड्समुळे आणि पर्यटकांची हुल्लडबाजी, निष्काळजीपणा आणि गैरवर्तणुकीमुळे धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांची बदनामी होत आहे. काही तरुण रील्स बनवण्यासाठी तसेच आपली प्रसिद्धी वाढविण्यासाठी हे सर्व जरी नव्या पिढीच्या अभिव्यक्तीचं माध्यम असलं तरी धार्मिक स्थळांवर याचा अतिरेक होत आहे. तरुणाई कुंडात उड्या मारताना किंवा पोहताना अगदी काहीवेळा अशोभनीय पोशाखात डान्स करताना दिसत आहेत. हे सर्व अशोभनीय व पावित्र्य बिघडवून टाकण्याचा प्रकार आहे. तसेच मलप्रभा कुंडातील पाण्याची पातळी खोल आहे. अनेकांना त्याची कल्पना नसते. पर्यटक अगदी बिनधास्तपणे उड्या मारतात, त्यामुळे एखादी दुर्घटना घडू शकते. सध्या त्या परिसरात ना पोलीस, ना सुरक्षारक्षक, ना धोक्याचे फलक, ना कोणतेही नियंत्रण. त्यामुळे प्रशासनाने व मंदिर कमिटीने वेळीच उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
रील्स बनवण्याचे फॅड : पर्यटकांच्या गर्दीला आवर घालण्याची गरज
मलप्रभा नदीच्या उगमस्थानावरील श्री माउली देवी मंदिर हे ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहे. तसेच मंदिर परिसरात असलेल्या जलकुंडांचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी मंदिर कमिटीने कडक नियमावली तयार करून कठोर उपाययोजना करावी, अशी मागणी गावातील काही तरुणांनी केली आहे. मात्र सध्या या पवित्र कुंडाच्या वापराबाबत काही चिंताजनक बाबी समोर येत आहेत. सोशल मिडियावर रील्स व्हायरल होत आहेत. त्यामुळेच पर्यटकांची दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. धार्मिक स्थळांचा मनोरंजन स्थळ किंवा मौजमजा करण्याचे ठिकाण म्हणून पर्यटकांकडून वापर होत आहे. या पार्श्वभूमीवर कणकुंबी ग्रामस्थांनी एकत्र येऊन विचार करण्याची गरज आहे.









