स्थानिकांची मागणी, गौरव सिंग याचा मृतदेह तीन दिवसांनी सापडला
वाळपई / प्रतिनिधी
कुमठोळ काजरेधाट येथील धबधब्यावर वास्को येथील दोन तरुण बुडाले होते. पैकी शशी सोमनाळ याचा मृतदेह त्याच दिवशी पाण्यात तरंगताना आढळला होता. मात्र गौरव सिंग याचा मृतदेह सापडला नव्हता. गेल्या दोन दिवसापासून शोधाशोध सुरु होती. बुधवारी सकाळी नौदलाच्या जवानांना पाचरण करून शोधाशोध सुरू केली असता 11 वाजता गौरव याचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळला. दरम्यान सदर धबधब्यावर दोन तरुण बुडाल्याच्या घटनेची ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली असून या धबधब्यावर पर्यटकांना बंदी घालावी, अशी मागणी केली आहे.
वास्को येथील आठ जणांचा गट सोमवारी कुमठोळ काजरेधाट येथील धबधब्यावर सहलीसाठी आला होता. आंघोळ करत असताना शशी सोमनाळ व गौरव सिंग हे दोघे पाण्यामध्ये बुडाले. काही वेळानंतर शशी सोमनाळ याचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळला होता. गौरव सिंग याचा गेल्या तीन दिवसापासून शोध सुरू होता. वाळपई अग्निशामक दलाचे जवान, वाळपई पोलीस, वनखात्याचे कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थ शोध घेत होते. मात्र तो सापडला नव्हता.
नौदलाच्या जवानांना पाचारण
गेल्या दोन दिवसापासून गौरव सिंग सापडत नसल्यामुळे सरकारी यंत्रणेसमोर पेच निर्माण झाला होता. शेवटी शोध घेण्यासाठी नौदलाच्या जवानांना बुधवारी पाचारण केले. सकाळी शोधाशोध सुरू केली असता अचानकपणे गौरव सिंग याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. यावेळी वाळपई अग्निशामक दलाचे जवान, वन खात्याचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी व नौदलाचे जवान उपस्थित होते.
गौरव सिंग सापडत नसल्यामुळे आम्हाला निमंत्रित केले. त्याचा शोध घेण्यास सुरूवात केली असता अचानकपणे नैसर्गिकरित्या मृतदेह पाण्यात तरंगताना आढळला. त्यानंतर तो पाण्यातून बाहेर काढण्यात आलेला आहे, असे नौदलाच्या जवानांनी सांगितले.
देवाला घातले साकडे
दरम्यान, सदर जागा ही जागृत असल्याचे मानले जाते. आतापर्यंत कोणत्याही प्रकारे अनूचित घटना घडली नव्हती. यामुळे चिंताग्रस्त बनलेल्या स्थानिकांनी शेवटी देवाला साकडे घातले, अशी माहिती यावेळी स्थानिकांनी दिली. दरम्यान या घटनेबाबत स्थानिकांनी चिंता व्यक्त केली असून येणाऱया काळात सदर धबधब्यावर पर्यटकांना बंदी घालावी, अशी मागणी केलेली आहे.
गौरव सिंग याचा मृतदेह सापडल्यानंतर वाळपईचे पोलीस निरीक्षक प्रज्योत फडते यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आला. कागदपत्रे सोपस्कार पूर्ण केल्यानंतर मृतदेह गोवा मेडिकल कॉलेजमध्ये चिकित्सेसाठी पाठविलेला आहे. दरम्यान, आतापर्यंत कुणावरही गुन्हा दाखल केलेला नाही. मात्र यासंदर्भात तपास सुरू असल्याची माहिती निरीक्षक प्रज्योत फडते यांनी दिली.









