पाटगांव/ वार्ताहर
रांगणा किल्ल्यावर वर्षा पर्यटनासाठी गेलेले इचलकरंजी व कागल येथील पर्यटक रात्रभर अडकले होते मात्र स्थानिक रहिवाशी, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने पंधरा ते सोळा पर्यटकांची बुधवारी चार वाजता पहाटे सुटका करण्यात आली.
याबाबत स्थानिक ग्रामस्थानी दिलेल्या माहितीनुसार इचलकरजी व कागल येथील पर्यटक रांगणा किल्लावर गेले होते मात्र सांयकाळ च्या सुमारास परत येताना पावसाचे प्रमाण वाढले त्यामूळे भटवाडी येथील वाघ ओहळ नावाच्या ओढ्याचे पाणी वाढले त्यामुळे पर्यटना साठी गेलेले सुमारे 17 पर्यटकांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यातच त्यातील दोन पर्यटकांनी धाडस करून ओढा पार केला आणि भटवाडी येथील पोलीस पाटील यांना पर्यटक मित्र अडकल्याची माहती दिली. तसेच त्यानी आपल्या नातेवाईकांना फोन करून घटनेची माहिती सांगितली. त्यानंतर नातेवाईकांनी भुदरगड पोलीस ठाणे व तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर अंतुरलीचे पोलीस पाटील बाबाजी देसाई अंतुर्ली गावचे सरपंच रामदास देसाई शिवाज्ञा ग्रुपचे सचिन देसाई गुरुनाथ वास्कर प्रकाश परब यांच्या सह आपत्कालीन व्यवस्थापन व स्थानिक ग्रामस्थांनी पहाटे चारच्या सुमारास भटवाडी येथील वाघ ओहोळ ओड्यावर गेले तिथून त्यांनी रेस्क्यू करत सर्व पर्यटकांना सुखरूप बाहेर काढले.
पावसाच्या उघडझापमुळे पर्यटक पाटगाव परिसरातील नयनरम्य निसर्ग व शिवडाव-नाईकवाडी, नितवडे-खेडगे, तोरस्करवाडी येथील धबधबे तसेच रांगणा किल्ल्यावर पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात जात आहेत. मात्र गेल्या दोन दिवसापासून पावसाने दमदार सुरुवात केली आहे त्यामुळे नदी नाल्यातून जोरदार पाणी प्रवाह सुरू झाला आहे. मंगळवारी रांगणा पर्यटनासाठी पंधरा ते सोळा पर्यटक भटवाडी चिक्केवाडीच्या ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे रात्रभर अन्न पाण्या विना अडकले होते. पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित देशमुख, आपत्ती व्यवस्थापन पथकाने बुधवारी पहाटे पाच वा. सुमारास सुटका केली. यासाठी दोरचा वापर करावा लागला.
वन परिक्षेत्र कडगांव कार्यालयाकडूनपाटगाव परिसरात तील चिक्केवाडी व रांगणा भागात सध्या मुसळधार पाऊस होत असल्यामुळे रांगणा कडे जाणारा मार्ग बंद करत असल्याचे बॅनर लावण्यात आले आहे. पाटगाव परिसरात अतिवृष्टी सुरू असुन नदी-नाल्यांच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. पर्यटकांनी अनोळखी ठिकाणी पर्यटनास जाताना त्या परिसराची, पावसाची माहिती घ्यावी. नदी नाले पार करून नये स्वत:ची काळजी घ्यावी. जीव धोक्यात घालून पर्यटनासाठी जाऊ नये असे आवाहन भुदरगडचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी म्हटले आहे.









