कोल्हापूर :
गगनबावडा परिसर नाताळच्या सुट्यामुळे पर्यटकांनी फुल्ल झाला आहे.‘मिनी महाबळेश्वर‘ म्हणून गगनबावाद्याचा उल्लेख केला जातो.कोकणला जोडणारा दुवा म्हणून गगनबावड्यातील करूळ व भुईबावडा या दोन घाटांचा समावेश होतो.मुंबई,पुणे यासह विविध शहरामध्ये शाळांना पडलेल्या नाताळ सुट्यामुळे हिवाळ्यातील गुलाबी थंडीतून पर्यटकांची वर्दळ सुरु असल्याचे गगनबावड्यात पहावयास मिळत आहे.पण खराब रस्त्यामुळे मात्र पर्यटक वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. गगनबावड्यातील निसर्गात हिरवळीवर भर घालण्यासाठी असणारे व निळेसार पाणी असणारे लखमापूर ,अणदूर ,कोदे,वेसरफ या ठिकाणचे तलाव पर्यटकांना निसर्ग सौदर्याचे आकर्षण आहेत.सहाजिकच पर्यटकांचा त्याठिकाणी ओढा वाढलेला दिसतो.पाण्याने भरलेले तलाव सभोतालची हिरवळ झाडे ,काही तलावाच्या ठिकाणी असणारे सिमेंट कट्टे ,मनसोक्त पोहणे त्यामुळे तलावा ठिकाणी कुटुंबासह सहली आयोजित केल्या जात आहेत.पर्यटकांच्या वाढत्या वावरामुळे सभोतली चार चाकी ,दोन चाकी वाहनांची गर्दी दिसून येते.त्यामुळे तलावाजवळ पर्यटकांचे जथ्थेच्या जथ्थे दिसून येतात.कोल्हापूर–गगनबावडा मार्गावर असणारे धाबे तर पर्यटकांना मेजवानीसाठी जणू आमंत्रणच देत आहेत.त्यामुळे धाब्याची संख्याही वाढली आहे. पर्यटकांना जेवणासाठी पायपीट किंवा त्रास सहन करावा लागत नाही. गगनबावड्यातील गगनगिरी महाराजांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या गगनगिरी मठावरून (गगनगड )कोकण दृश्य टिपन्यासाठी पर्यटक गर्दी करतात.पर्यटकांना तेथे मिळण्राया सोयी सुविधा समाधानाच्या वाटतात.दोन्ही बाजूला असणारे नागमोडे घाट सर्वांचे लक्ष वेधून घेतात.कोकणातील अथांग पर्वत रांगा डोळ्याच्या पारणे फेडतात.कोकण दर्शन याच गडावरून पर्यटकांना पहावयास मिळते.पळसंबे येथील शांत वातावरणातील ‘रामलिंग मठ‘ (पुरातन लेणी ) पुरातन काळाची आठवण करून देतात.पांडवकालीन कलाकृती पर्यटकांना इतिहास आठवून देतात.प.डॉ.डी.वाय.पाटील साखर कारखान्यासमोर असलेल्या सिनेअभिनेता कै.लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या ‘पछाडलेल्या‘चित्रपटाचे चित्रीकरण केलेल्या बावडेकर सरकारांचा बंगला पर्यटकांना खुला असल्याने त्या ठिकाणी शाळा,महाविद्यालयाच्या सहली आयोजित केल्या जात आहेत.त्याचशिवाय त्या ठिकाणी पर्यटकांना विशेष माहिती सांगण्यासाठी असणारा माहितीगार इतिहासातील न ऐकलेल्या विविध घटनांची माहिती सांगतो. बोरबेट येथील मोरजाई पठार व वेताळ माळ येथील निसर्गाच्या सानिध्याचा पर्यटकांना आस्वाद घेता येतो.
खराब रस्त्याचा हॉटेल व्यवसायावर परिणाम
कोल्हापूर गगनबावडा मार्गावर कळे गावापासून पुढे रस्ता मोठ्या प्रमाणात खराब असल्याने त्याचा परिणाम हॉटेल व्यवसायावर होत आहे.त्यामुळे रस्ता कधी सुसाट होणार असा प्रश्न आम्हा व्यवसायाकाना पडला आहे.








