चिंब भिजण्यासाठी गर्दी : हिरवाईसोबत सेल्फीही
बेळगाव : गेल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे सुंडी, ता. चंदगड येथील वझर धबधबा प्रवाहित झाला आहे. धबधब्याच्या पाण्यात भिजण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. नैसर्गिकरीत्या डोंगराच्या कुशीतून प्रवाहित या धबधब्यावर तरुण-तरुणींची वर्दळ वाढत आहे. त्यामुळे वझर पर्यटकांनी फुलू लागला आहे. यंदा वळीवासह संपूर्ण जून महिनाही कोरडाच गेला. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा साऱ्यांनाच लागली होती. जुलैच्या मध्यानंतर पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे नदी-नाले व लहान सहान धबधबेही प्रवाहित झाले आहेत. बेळगावहून 20 कि.मी. अंतरावरील सुंडीच्या धबधब्याकडे पर्यटकांची पावले वळत आहेत. शनिवारी आणि रविवारी पर्यटकांची गर्दी होत आहे. धबधब्याकडे जाताना हिरवीगार शेती आणि वनराई भुरळ घालत आहे. त्यामुळे तरुण नैसर्गिक धबधब्यासह हिरव्यागार शेतीबरोबर सेल्फी घेत आहेत. मुख्य ठिकाणी 30 ते 40 फुटांवरून पडणारा धबधबा पर्यटकांना मोहित करू लागला आहे.
पार्किंगची समस्या
शिनोळी फाट्यापासून धबधब्यापर्यंत अरुंद रस्ता आहे. दरम्यान, दुचाकी आणि चार चाकी घेऊन जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे रस्त्यावर आणि धबधबा स्थळांवर पार्किंगची समस्या गंभीर बनू लागली आहे. यातून बाहेर पडताना वाहनधारकांची दमछाक होत आहे.









