लोणावळा / वार्ताहर :
नाताळ व नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने लोणावळ्यातील पर्यटनस्थळांचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनो मास्क वापराच, असे आवाहन लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक पंडित पाटील यांनी केले आहे.
पंडित पाटील म्हणाले, कोरोना साथरोगाचा प्रसार काही देशांमध्ये वाढू लागला आहे. भारतात देखील काही प्रमाणात रुग्ण सापडू लागल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. लोणावळा हे पर्यटनस्थळ असल्याने याठिकाणी विविध भागातून पर्यटक येत असतात. गर्दी होण्याची देखील शक्यता असल्याने आपल्यामुळे इतरांना किंवा इतरांपासून आपल्याला कोरोना साथरोगाचा संसर्ग होऊ नये याकरिता लोणावळय़ात पर्यटनासाठी तसेच पाटर्य़ांसाठी येणाऱ्या पर्यटकांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा. सामाजिक अंतर राखावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. स्थानिक व्यावसायकांनी देखील संसर्ग टाळण्यासाठी मास्कचा वापर करावा. हॉटेल व बंगलो व्यावसायकांनी येणाऱ्या पर्यटकांना मास्क व सॅनिटायझर वापराबाबत सूचित करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक वाचा; Pune : वैकुंठ स्मशानभूमीत मध्यरात्री अघोरी प्रकार; दोन तृतीयपंथीयांना अटक
पोलीस प्रशासनाकडून शहरातील व ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी खबरदारीचे उपाय करण्यात आले आहे. हॉटेल, बंगले, टेन्ट व्यावसायकांच्या मिटिंगा घेत त्यांना सुरक्षेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आपल्या अस्थापनांमध्ये काही अवैध अथवा चुकीच्या घटना घडणार नाहीत याची खबरदारी घ्या अन्यथा कडक कारवाईचा देखील इशारा सहाय्यक पोलीस अधीक्षक लोणावळा विभाग आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी दिला आहे.
पर्यटकांना देखील पर्यटनस्थळ येताना व पर्यटनाचा आनंद घेताना इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या असे आवाहन करण्यात आले आहे. सोबतच सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करणे, मद्यप्राशन करुन वाहने चालविणे, मोठय़ा आवाजात स्पिकर लावत शांततेचा भंग करणे असे प्रकार करताना आढळल्यास कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. शहरात व ग्रामीण भागात वाहने तपासणीसाठी चेकपोस्ट लावण्यात येणार आहेत.