मोठय़ा संख्येने पर्यटकांची धबधब्याचा आस्वाद घेण्यासाठी गर्दी. स्थानिक व देशी पर्यटक अधिक फेसाळणाऱया पाण्यातून उडणाऱया तुषाराचा लुटला आनंद
रविराज च्यारी/डिचोली
राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पावसाळी पर्यटनाला बहर आलेला आहे. डोंगर कपारीतून ओसंडून वाहणाऱया लहान मोठय़ा मनमोहन धबधब्यांनी डोंगर जंगलांची शान वाढविण्यास प्रारंभ केला आहे. अशा या पर्यटनाला साद घालणाऱया धबधब्यांकडे अंगावर पाऊस घेत पर्यटकांची पावले वळली नाही म्हणजे नवलच. सध्या साखळीतील हरवळे तीर्थक्षेत्रावर श्री रूदेश्वराच्या चरणी ओसंडून वाहणाऱया धबधब्याच्या पाण्याचे तुषार अंगावर घेत सुखद अनुभव घेण्यासाठी धबधब्यावर मोठी गर्दी होत आहे.
गेले अनेक दिवस सुरू असलेल्या पावसाने काल रविवारी (दि. 3 जुलै) आपला जोर कमी केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांनी “संडे पर्यटन” साजरे केले. काल हरवळे धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी पहायला मिळाली. उंचावरून खाली पाण्यात कोसळणाऱया या धबधब्यामुळे हवेत उडणारे पाण्याचे तुषार अंगावर झेलत पर्यटक या धबधब्याचा सुखद अनुभव घेत होते. या पर्यटकांमध्ये गोव्यातील स्थानिक पर्यटकांबरोबरच परप्रांतीय पर्यटकही मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
जोरदारपणे सलग पाऊस पडल्यावर श्री रूदेश्वर मंदिराच्या समोर कोसळणाऱया या धबधब्याला उधाड येत असते. आपल्या सर्व सीमा ओलांडून हा धबधबा खाली झेप घेत असतो. यावेळी हवेत मोठय़ा प्रमाणात तुषार उडत असतात. या तुषारांमुळे धबधबा न्याहाळणाऱयांचे अंग चिंब भिजते. आणि या धबधब्याचा खरा अनुभव पावसात घेता येतो. नेमका हाच क्षण अनुभवण्यासाठी अनेकजण या धबधब्याला भेट देत असतात.
साखळी परिसरात जवळपास अशा प्रकारचे पर्यटन स्थळ नाही. पावसाळय़ात लोक थेट चोर्ला किंवा सत्तरी तालुक्मयातील विविध गावांमधील धबधब्यांकडे जात असतात. हरवळे धबधब्याचा आनंद केवळ दूरूनच लुटता येतो. कारण या धबधब्याच्या पायथ्याशी जाऊन वरून पडणारे पाणी अंगावर घेता येत नाही. धबधब्याचे पाणी पडून निर्माण होणाऱया नदीवर आंघोळ करण्यास पोहण्यास सक्ती मनाई आहे. तरीही काही उतावीळ पर्यटन हे धाडस करतात आणि आपला जीव गमावून बसतात. अशा धाडसातच अनेकांना आपले प्राण गमावण्याची पाळी राज्याबाहेरील पर्यटकांवर आली आहे. सध्याच्या परिस्थितीत धबधब्यावर येणारे पर्यटक खालील नदीच्या काठावरील भागात पाण्यात उतरून आनंद लुटतात. मोठय़ा प्रमाणात फोटो सेशन तेथे चालते. तसेच धबधब्याच्या ठिकाणीही सेल्फी व फोटो काढण्यात तरूणाई दंग असल्याचे दिसून येते. असे प्रकार करताना जागेचे भान ठेवत स्वतःच्या जीवाच्या सुरक्षिततेकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे.









