6 जणांचा मृत्यू : 29 प्रवाशांना वाचविले : लाल समुद्रातील घटना
वृत्तसंस्था/काहिरा
इजिप्तच्या लाल समुद्रात एक पर्यटक पाणबुडी बुडाल्याने किमान सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. हा अपघात हुरघाडाजवळ घडला. घटनेनंतर अनेक रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात नऊ जण जखमी झाले असून चार जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बचाव कार्यादरम्यान इतर 29 प्रवाशांना वाचवण्यात आले. अपघाताचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. इजिप्तच्या सरकारी वृत्तपत्र ‘अखबार अल-यूम’वरील वृत्तामध्ये सर्व मृत रशियामधील असल्याचे जाहीर केले आहे.
इजिप्तमधील रशियन दूतावासाने याला दुजोरा देत पाणबुडीतील सर्व पर्यटक रशियन होते असे स्पष्ट केले. बुडालेल्या पाणबुडीचे नाव सिंदबाद असे आहे. ही पर्यटक पाणबुडी अनेक वर्षांपासून पर्यटकांच्या सेवेत कार्यरत होती. वातानुकूलित आणि सुरक्षित पाणबुडीतून लाल समुद्राच्या सौंदर्याचा आनंद घेता येत होता. या पाणबुडीत 44 प्रवासी आसने आणि मोठ्या काचेच्या खिडक्या असल्यामुळे लोक समुद्राखालील अद्भूत दृश्य पाहण्याचा आनंद लुटत असत. ही पाणबुडी पर्यटकांना समुद्रात 25 मीटर (82 फूट) खोलीवर घेऊन जात त्यांना 500 मीटर परिघातील प्रवाळ खडक आणि त्यातील सागरी प्राणी दाखवण्याची सेवा बजावते.









