सातारा :
धुमाळवाडी (ता. फलटण) येथील धबधब्याजवळ पर्यटनासाठी आलेल्या पती-पत्नी व आणखी एकाला पाच जणांनी दमदाटी करून लुटले आहे. राहुल भारत मंजरतकर (वय 46), सुषमा राहूल मंजरतकर ( दोघे रा. शुक्रवार पेठ, फलटण) व मनोज रामचंद्र शेडगे (रा. फलटण) यांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून रोख रक्कम व दागिने काढून घेतले. याप्रकरणी राहुल यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाच जणांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, धुमाळवाडी धबधब्याजवळ राहुल मंजरतकर व त्याच्या पत्नी सुषमा मंजरतकर व मनोज शेडगे हे पर्यटनासाठी गेले होते. यावेळी पाच अज्ञात इसमांनी त्यांच्यावर पाळत ठेवली. काही वेळाने त्यांना अडवून दमदाटी करण्यास सुरूवात केली. यामुळे तिघेही घाबरले. त्यांना लाकडी दाडके, लोखंडी सुरा दाखवून पैशाची मागणी केली. हे पैसे देण्यास नकार देताच राहुल यांच्या खिशातून पैसे काढून घेतले. मनोज यांचे घड्याळ व बॅगेतील साहित्य काढून घेतले. सुषमा यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. याच ठिकाणी आणखी एक पर्यटक होता. त्याच्या चांदीच्या अंगठ्या काढून घेतल्या, असा 54 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल काढून घेतला आणि तिथून निघून गेले.
या घटनेनंतर राहुल मंजरतकर यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात जाऊन घडलेला प्रकार सांगून तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे दीपक नामदेव मसुगडे (वय 31, रा. मलवडी ता. माण), विलास दत्तात्रय गुजले (वय 21, रा. सोनगाव ता. फलटण) यांना अटक केली आहे. इतर तीन जणांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांनी दिली..








