उन्हाळी सुट्ट्यांमुळे पर्यटन हंगाम सुरू असल्याने राज्यातील व परराज्यातीलही पर्यटकांनी कोकण किनारपट्टीला पर्यटनासाठी सर्वाधिक पसंती दिली आहे. त्यामुळे कोकणात पर्यटन बहरले आहे. प्रसिद्ध असलेल्या कोकणातील तारकर्ली व गणपतीमुळे समुद्र किनाऱ्यावर सध्या पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. कोकणात दरवर्षी पर्यटकांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. वाढत्या पर्यटकांची संख्या लक्षात घेऊन आगामी काळात पर्यटकांना अधिकाधिक सुविधा व त्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना कराव्या लागतील.
कोकण म्हटलं की, निसर्ग सौंदर्याने नटलेला प्रदेश म्हटले जाते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन्ही जिल्हे निसर्ग सौंदर्याने नटलेले असून पूर्वेकडे सह्याद्री पर्वताच्या रांगा, तर पश्चिमेकडे स्वच्छ समुद्र किनारे, त्याशिवाय विविध पर्यटन स्थळे, रेखीव पुरातन मंदिरे, ऐतिहासिक राजवाडे, आंबोलीसारखे थंड हवेचे ठिकाण अशी अनेक पर्यटन स्थळे असल्याने पर्यटक नेहमीच कोकणला अधिक पसंती देतात. सिंधुदुर्ग हा तर देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित आहे. पर्यटन जिल्हा घोषित होऊन 26 वर्षे झाली. गेल्या 26 वर्षांत सुरुवातीच्या काळात पर्यटन विकासाला म्हणावी तशी गती मिळाली नाही, मात्र गेल्या पाच ते दहा वर्षांत पर्यटकांची संख्या वाढत चालली आहे.
कोकणातील स्वच्छ समुद्र किनारे, सह्याद्री पर्वतांच्या रांगांमध्ये जंगल भटकंती यासाठी पर्यटक नेहमीच इच्छूक असतात. परंतु, पर्यटन स्थळांकडे जाणारे मार्ग व इतर पायाभूत सुविधांअभावी पर्यटक येत नव्हते. आता या सुविधा निर्माण झाल्याने केवळ राज्यातूनच नाही, तर देशभरातून पर्यटक येऊ लागले आहेत. अनेक सेलिब्रेटी येऊ लागले आहेत. महान क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडूलकर याने तर कोकणातील पर्यटनाला पसंती देत आपला 50 वा वाढदिवस सिंधुदुर्गातील भोगवे किनारपट्टीवर अलीकडेच साजरा केला.
उन्हाळी सुट्ट्या सुरू असल्याने पर्यटन हंगाम बहरात आहे. कोकणातील बरेच लोक नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबई-पुणे व इतर ठिकाणी राहतात आणि उन्हाळी सुट्टीत गावी परतात. त्यामुळे कोकणात सध्या चाकरमान्यांची गर्दी आहेच, त्या शिवाय राज्यासह परराज्यांतून येणाऱ्या पर्यटकांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. किनारपट्टी भागातील सर्व हॉटेल्स, लॉज हाऊसफुल्ल झाल्याचेही चित्र आहे.
कोकणातील जलपर्यटन व स्कुबा डायव्हिंगला पर्यटकांची मोठी पसंती आहे. सिंधुदुर्गातील तारकर्ली, देवबाग, वेळागर, भोगवे, रत्नागिरीतील गणपतीपुळे, हर्णे तसेच भाट्यो बीचवरही जलक्रीडा पर्यटनासाठी गर्दी होऊ लागली आहे. जलदुर्ग असलेला सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्याही वाढत आहे. त्याशिवाय जिल्ह्यातील पुरातन मंदिरे, गड, किल्ले याठिकाणीही पर्यटक भेटी देत आहेत.
कोकणात वर्षा पर्यटनालाही फार मोठी संधी आहे. जगप्रसिद्ध आंबोली हे थंड हवेच्या ठिकाणाबरोबरच वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर कृषी पर्यटनामध्येही फार संधी आहे. अलीकडील काळात कृषी पर्यटनाकडे पर्यटक वळू लागले आहेत. कृषी पर्यटनाची जोड देऊन छोटेछोटे रिसॉर्ट निर्माण होऊ लागले आहेत. त्याशिवाय रत्नागिरीतील थिबा पॅलेस, सावंतवाडीतील राजवाडा पाहण्यासाठीही पर्यटक येत असतात. त्यामुळे कोकणात उन्हाळी सुट्टीत आलेले पर्यटक वर्षभरात इतर वेळीही येऊ शकतात. त्यासाठी पर्यटकांना चांगल्या सुविधा निर्माण करायला हव्यात. रेल्वेमधून येणाऱ्या पर्यटकांना दोन-दोन दिवसांची टूर पॅकेजीस सुरू करायला हवीत.
किनारपट्टीवर येणाऱ्या पर्यटकांची संख्या भविष्यात वाढतच जाणार आहे. त्यामुळे चांगल्या सुविधा पुरविणे, हेही मोठे आव्हान आहे. पर्यटकांना मालवणी पद्धतीच्या जेवणापासून वेगवेगळ्या खाद्यपदार्थांच्या सोयी निर्माण करायला हव्यात. राहण्यासाठी अनेकवेळा लॉजही मिळत नाहीत, अशी स्थिती निर्माण होते. त्यामुळे राहण्याच्या दर्जेदार सुविधा निर्माण व्हायला हव्यात. केवळ एका दिवसासाठी येणारा पर्यटक नको आहे. अधिकाधिक कालावधीसाठी राहणारा पर्यटक कोकणात आला, तर कोकणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. मग ग्रीन रिफायनरीसारखे वेगळे प्रकल्प आणण्याची गरज भासणार नाही. पर्यटनावर आधारित व्यवसाय निर्माण होतील आणि कोकण समृद्ध होईल.
किनारपट्टीवर मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षितताही तेवढीच महत्त्वाची आहे. थोडासाही निष्काळजीपणा एखाद्या पर्यटकासाठी जीवावर बेतू शकतो. गतवर्षी 24 मे रोजी तारकर्ली किनारपट्टीवर पर्यटकांना समुद्रात घेऊन गेलेली बोट उलटली आणि त्यात दोन पर्यटकांचा मृत्यू झाला होता. स्कूबा डायव्हिंगसाठी पर्यटकांची गेलेली बोट परत येत असताना ही दुर्घटना घडली होती. बोटीत 20 पर्यटकांचा समावेश होता. त्यावेळी स्थानिकांच्या मदतीने पर्यटकांना वाचविण्यात यश आले. परंतु, दोघा पर्यटकांनी जीव गमावलाच. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.
कोकणातील पर्यटन हे स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी स्वबळावर वाढविले आहे. पर्यटन व्यवसाय हा आता कोकणातील एक नंबरचा व्यवसाय बनला आहे. परंतु एखादी दुर्घटना घडते तेव्हा पर्यटन व्यवसायावर व पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे पर्यटकांना सेवा देत असताना त्यांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य द्यायलाच हवे. समुद्री पर्यटनावेळी वातावरण अनुकुल आहे किंवा नाही, हे पाहणेही जास्त जबाबदारीचे असते. सध्या उन्हाळी हंगाम सुरू असल्याने समुद्रातील वातावरण चांगले आहे. परंतु, पावसाळी हंगाम जवळ येऊ लागताच वातावरणातील बदल लक्षात घ्यायला हवेत. पर्यटकांच्या सुरक्षिततेची काळजी घेतल्यास कोकणात पर्यटन अधिकाधिक बहरू शकते आणि कोकणची अर्थव्यवस्था पर्यटनावरच अधिक मजबूत होऊ शकते.
संदीप गावडे








