सुरक्षा दलांनी 175 जणांना घेतले ताब्यात : अनंतनाग येथे कारवाई
वृत्तसंस्था/ श्रीनगर
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी संवेदनशील भागांमध्ये सैन्य, सीआरपीएफ आणि अन्य सुरक्षा दलांसोबत मिळून व्यापक शोध अन् घेराबंदी मोहीम सुरू केली आहे. अत्यंत सतर्कतेसह दिवसरात्र शोधमोहीम राबविण्यात येत आहे. यानुसार अनंतनाग जिल्ह्यात विविध ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. दहशतवादी कारवायांमध्ये सहाय्य करणाऱ्या नेटवर्कला उद्ध्वस्त करण्यासाठी आतापर्यंत जवळपास 175 संशयितांना ताब्यात घेत कसून चौकशी केली जात आहे.
सुरक्षा वाढविणे, संशयास्पद हालचालींवर नजर ठेवणे आणि सार्वजनिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी संवेदनशील जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त मोबाइल व्हीकल चेक पोस्ट स्थापन करण्यात आले आहेत. जनतेला सहकार्याचे आवाहन करण्या तआले असून कुठल्याही संशयास्पद हालचालींची माहिती नजीकच्या पोलीस स्थानकाला देण्याची सूचना नागरिकांना करण्यात आली आहे.
राजौरीत सुरक्षा दल हाय अलर्टवर
राजौरी क्षेत्रातही सुरक्षा दलांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. जम्मू-राजौरी-पुंछ महामार्गावर वाहनांची तपासणी केली जात आहे. दहशतवादी हल्ला रोखण्यासाठी मोठ्या संख्येत जवान तैनात करण्यात आले आहेत.









