एक गंभीर जखमी : हाऊरी येथील शिवारातील घटना : चौघांवर गुन्हा दाखल
खानापूर : तालुक्यातील हारुरी येथील शेतीच्या संरक्षणासाठी ऊसाच्या पिकाभोवती तयार करण्यात आलेल्या तारेच्या कुंपणला विद्युत प्रवाह जोडण्यात आला होता. या विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने यशवंत शिवठणकर या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून पांडुरंग शिवठणकर हे गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी 9 वाजता घडली. जखमीला अधिक उपचारासाठी बेळगाव येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याबाबत खानापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. या विरोधात चौघावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पोलिसान्ंााr अटक केली आहे. रात्री उशिरा न्यायालयासमोर त्यांना हजर करण्यात आले. मधू बडकू शिवठणकर (वय 50), चंद्रशेखर मधू शिवठणकर (32), जोतिबा मधू शिवठणकर (वय 29), रुक्मिणी उर्फ शांता मधू शिवठणकर (वय 45) यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. या चौघांनी आपल्या शेतासभोवती ऊस पिकाच्या संरक्षणासाठी तारेचे कुपंण घातले आहे. या तारेच्या कुंपणाला विद्युत पुरवठा जोडण्यात आला होता. त्यामुळे विजेच्या धक्क्याने एका शेतकऱ्याचा बळी गेला.
याबाबत माहिती अशी की, हारुरी येथील शेतकरी यशवंत लकमाण्णा शिवठणकर (वय 72), त्याचा भाऊ पांडुरंग शिवठणकर ( वय 65) हे भातपीक पावसाविना सुकू लागल्याने भात पिकासाठी पाणी सोडण्यासाठी शनिवारी त्यांनी कूपनलिकेचे पाणी सुरु केले होते. रविवारी सकाळी भात पिकात पाणी पाहण्यासाठी गेले असता शेजारील शेतकरी मधू शिवठणकर यांनी शेतीच्या संरक्षणासाठी ऊस पिकाच्या भोवती तारेच्या कुंपणात विद्युत प्रवाह जोडला होता. पाणी पाहण्यासाठी गेलेल्या यशवंत लकमाण्णा शिवठणकर यांचा विद्युतभारित तारेला स्पर्श होताच ते विजेच्या धक्याने खाली कोसळले. आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी त्यांचे भाऊ पांडुरंग शिवठणकर हे त्यांना वाचवण्यासाठी गेले असता त्यांनाही जोरदार विजेचा धक्का लागल्याने ते जखमी झाले. यावेळी शेजारील शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी ही घटना पाहून याबाबतची माहिती हेस्कॉम अधिकाऱ्यांना दिली. आणि या ठिकाणचा विद्युतप्रवाह बंद करण्याची सूचना केली. यानंतर गावातील लोक शेतात आल्यानंतर विजेच्या धक्याने जखमी झालेले पांडुरंग शिवठणकर यांना बाजूला करण्यात आले. आणि त्यांना उपचारासाठी खानापूर सरकारी दवाखान्यात आणले असता त्यांना अधिक उपचारासाठी बेळगाव सिव्हील हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे.
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे उत्तरीय तपासणीस दोन तास उशीर
खानापूर रुग्णालयातील ड्युटी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे उत्तरीय तपासणी करण्यास दोन तास उशीर झाला. याबाबत हारुरी ग्रामस्थांनी खानापूर सरकारी दवाखान्याच्या आवारात गर्दी केली होती. पोलिसानी दुपारी 2 वाजताच रितसर गुन्हा दाखल करुन उत्तरीय तपासणीसाठी कागदपत्रांची पूर्तता केली होती. मात्र ड्युटी डॉक्टरानी दुपारी 2 वाजल्यापासून 4.30 पर्यंत याबाबत दुर्लक्ष करुन वेळकाढूपणा केला होता. यानंतर येथील दवाखान्याच्या आवारात हारुरी ग्रामस्थांनी डॉक्टराविरोधात जोरदार आवाज उठविला आणि तालुका वैद्याधिकारी संजय नांद्रे यांनाही दूरध्वनीवरुन संपर्क साधून ड्युटी डॉक्टराविरोधात माहिती देण्यात आली. यानंतर डॉक्टर नांद्रे यांनी डॉ. संतोष यांना तातडीने उत्तरीय तपासणी करण्याचे आदेश दिल्यानंतर सायंकाळी 4.30 नंतर डॉक्टरांनी उत्तरीय तपासणी केली. यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
या घटनेची माहिती मिळताच आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच याबाबत योग्य ती कारवाई करण्याची सूचना पोलिसाना केली. या घटनेनंतर हारुरी येथील ग्रामस्थांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्थानकासमोर जोरदार मागणी केली. यशवंत शिवठणकर आणि पांडुरंग शिवठणकर हे दोघे भाऊ अतिशय प्रेमाने एकत्र रहात होते. शेतीची अथवा इतर कोणतीही कोणतीही कामे ते दोघे मिळूनच करत होते. त्यांच्या या नात्यामुळे पंचक्रोशीत चर्चा होती. रविवारी सकाळी दोघे भाऊ मिळूनच भात शेतीला पाणी लावण्यासाठी गेले होते. त्यावेळी हा दुर्देवी प्रसंग ओढावला आहे. या घटनेमुळे हारुरी गावात हळहळ व्यक्त होत आहे.









