अथणीच्या विजय बार्लीचा बोगसगिरीत पराक्रम : सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकींना ठकविले : समाजमाध्यमांवरील अंधविश्वास भोवला

बेळगाव : सोशल मीडियाचे जितके फायदे आहेत, तितकेच तोटेही आहेत. व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम आदींच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार काही थांबेनात. इन्स्टाग्रामवरून सुरू असलेल्या फसवणुकीने तर सायबर क्राईम विभागासमोरच तपासाचे आव्हान उभे केले आहे. वारंवार जागृती करूनही लोक फशी पडत आहेत. निपाणी ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार यांच्या नावे इन्स्टाग्रामवर बोगस खाती उघडून अनेकांना ठकवणाऱ्या विजय श्रीशैल बार्ली (वय 28) मूळचा राहणार अथणी, सध्या राहणार हुबळी या तरुणाला अटक केल्यानंतर सोशल मीडियाचा अतिवापर व डोळे झाकून विश्वास ठेवण्याचे प्रकार किती महागात पडू शकतात, हे सामोरे आले आहे.
तब्बल 50 हून अधिक तरुणी संपर्कात
विजयच्या संपर्कात एक-दोन नव्हे तर तब्बल 50 हून अधिक तरुणी आल्या आहेत. यापैकी अनेक जणी त्याच्यावर जीवापाड प्रेम करतात. कारण एकच आहे, इन्स्टाग्रामवरील खात्यानुसार तो विजय नव्हे तर निपाणी ग्रामीणचा पोलीस उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार आहे. कसेही पोलीस दलात नोकरी आहे. त्याच्या प्रेमात पडले तर काही नुकसान होणार नाही, या विचाराने अनेक जणींनी स्वत:ची फसवणूक करून घेतली आहे.
जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सीईएनचे पोलीस निरीक्षक बी. आर. ग•sकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकाराचा पर्दाफाश केला आहे. कोरोनाच्या काळापासून विजय बार्लीने बोगस अकाऊंटच्या माध्यमातून फसवणुकीचा धंदा सुरू केला आहे. हा प्रकार अनेकांच्या लक्षात येऊनही कोणालाच तक्रार द्यावीशी वाटली नाही. त्यामुळे विजयचा वारू बेफाम दौडतच होता.
खरा पो. उपनिरीक्षक नसल्याने धक्का
या बोगस अकाऊंटला तब्बल 1 लाख 20 हजार फॉलोअर्स आहेत. असेच त्याने आणखी नऊ बोगस अकाऊंट उघडली आहेत. यापैकी महिला पोलीस व काही तरुणींच्या नावेही तो अकाऊंट ऑपरेट करतो. वेगवेगळ्या भूमिकेतून सोशल मीडियाचा वापर करून तो महिलांना ठकवतो आहे. आपण संपर्कात होतो, तो खरा पोलीस उपनिरीक्षक नाही तर तोतया आहे, हे लक्षात आल्यानंतर अनेक तरुणींना धक्का बसला आहे.
‘तरुण भारत’ला उपलब्ध झालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील एका तरुणीने विजयला म्हणजेच निपाणीच्या पोलीस उपनिरीक्षकाला चक्क प्रेमपत्रही लिहिले आहे. तिच्यासाठी तो सिंघम आहे. आपल्या सिंघमकडून खूप काही शिकण्यासारखे आहे, असे कौतुक करत त्या तरुणीने विजयवर जीव लावला होता. विजय खरा सिंघम नाही, हे लक्षात आल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. मात्र, त्यावर विश्वास ठेवता येईनासा झाला आहे.
नोकरीच्या आमिषाने 4 लाख उकळले
विजयकडून फशी पडलेल्यांमध्ये महिलाही आहेत. आपल्या ओळखीचा वापर करून अनेकांना नोकऱ्या लावण्याचे आश्वासन त्याने दिले आहे. काही जणींकडून नोकरी लावण्यासाठी पैसेही उकळले आहेत. सध्या तपास अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार 4 लाख रुपये नोकरीच्या आमिषाने उकळल्याचे सामोरे आले आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर अनेक तरुणी सायबर क्राईम विभागाकडे चौकशी करीत आहेत. आपला सिंघम सच्चा आहे, त्याला अटक का केली? असा संतप्त सवाल विचारत आहेत.
यावरून बोगस अकाऊंटवर सिंघमने मिळविलेली लोकप्रियता लक्षात येते. निपाणी ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार यांच्याही लक्षात हा प्रकार आला होता. आपल्या नावे बोगस अकाऊंट चालविले जात आहे, हे लक्षात आल्यानंतरही त्यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसते. त्यामुळेच सिंघमचे धैर्य वाढून तो मोकाट बनला. अनेक तरुणी सिंघमसाठी थेट जिल्हा पोलीसप्रमुखांना फोन करू लागल्या आहेत. त्यामुळेच सिंघमचे कारनामे उघडकीस आले. संपूर्ण देशात सायबर गुन्हेगारीत कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे. खासकरून इन्स्टाग्राम सायबर क्राईम विभागासाठी डोकेदुखीचे ठरले आहे. उपलब्ध माहितीनुसार राज्यात दरवर्षी 12 हजारहून अधिक सायबर गुन्हे घडतात. यापैकी 60 टक्क्यांहून अधिक सोशल मीडियाशी संबंधित गुन्हे असतात. खासकरून आर्थिक गुन्हेगारीची प्रकरणे असतात. आपल्या अकाऊंटचा गैरवापर होऊ नये यासाठी काळजी घेण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे.
फसवणूक कशी टाळाल?

सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारी फसवणूक टाळण्यासाठी पोलीस दलाच्यावतीने सतत जागृती केली जाते. तरीही फसवणुकीचे प्रकार सुरूच आहेत. जिल्हा सीईएनचे पोलीस निरीक्षक बी. आर. ग•sकर यांच्याशी संपर्क साधला असता, आपली व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडियावरील अकाऊंट कशी सुरक्षित राहतील, याची खबरदारी घेण्याची जबाबदारी प्रत्येकावर आहे. योग्य खबरदारी घेतली तरच फसवणूक टाळता येणार आहे. एखादा अधिकारी किंवा लोकप्रिय व्यक्तींच्या नावे उघडल्या जाणाऱ्या बोगस खात्यांना फॉलो करायचे का? याचा विचार केला असता तर ही फसवणूक झाली नसती. तब्बल 50 हून अधिक तरुणींची फसवणूक निव्वळ दुर्लक्षपणामुळे झाली आहे. फसवणूक टाळण्यासाठी आपले अकाऊंट सुरक्षितरीत्या लॉक करून ठेवणे, हा उत्तम पर्याय आहे, असे त्यांनी सांगितले.









