सलग चौथ्या दिवशी पावसाचा जोर कायम, अनेक ठिकाणचे रस्ते जलमय
काणकोण : काणकोण तालुक्यात सलग चौथ्या दिवशी देखील पावसाचा जोर कायम असून 7 रोजी 126.8 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाल्यामुळे या तालुक्यात आतापर्यंत 50 इंच इतक्या पावसाची नोंद झाली आहे. काही ठिकाणी रस्त्यावर झाडे पडण्याच्या त्याचप्रमाणे पाणी साचण्याच्या घटना जरी घडलेल्या असल्या, तरी कुठेच विपरित घटना घडल्याची नोंद नसल्याची माहिती मामलेदार मनोज कोरगावकर यांनी दिली. काणकोणचे उपजिल्हाधिकारी रमेश गावकर, मामलेदार कोरगावकर, अग्निशामक दलाचे प्रमुख रवींद्रनाथ पेडणेकर, पोलीस निरीक्षक चंद्रकांत गावस परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. सततच्या पावसामुळे आणि आवश्यक त्या वेळी रस्त्याच्या बाजूची गटारे साफ करण्याच्या बाबतीत नगरपालिका त्याचप्रमाणे पंचायतींनी देखील दुर्लक्ष केल्यामुळे तसेच रस्त्यालगत चालू असलेल्या बांधकामांमुळे पावसाचे पाणी वाहून जाण्याच्या पारंपरिक वाटा बंद झाल्याने रस्ते मात्र जलमय झाल्याचे चित्र या तालुक्यातील गुळे, आगस-माशे, गालजीबाग, मा•ाrतळप, चावडी, पैंगीण अशा सर्वच भागांत दिसून आले आहे. चापोली-गुळे येथील पुलाखाली पाणी साचल्यामुळे हा भाग पूर्णपणे जलमय झाला. दरम्यान, मोखर्ड येथे सुधाकर आश्वेलकर यांच्या मालकीच्या कारवर काजूचे झाड पडल्यामुळे कारची मोठी हानी झाली आहे. मागाहून वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांनी अग्निशामक दलाच्या सहकार्याने सदर झाड बाजूला केले.
राजबाग-तारीर येथे संरक्षक भिंतीला तडे
राजबाग, तारीर या ठिकाणी एका कंपनीमार्फत बांधायला घेतलेल्या बहुमजली इमारतीच्या बाजूच्या संरक्षक भिंतीला तडे गेले असून त्यामुळे या भिंतीच्या बाजूला असलेल्या घरांना धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करून स्थानिक नगरसेवक गंधेश मडगावकर यांनी काणकोणचे उपजिल्हाधिकारी गावकर यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. या भागातील लोकांना इतरत्र हलविण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, काणकोणच्या अर्धफोंड आणि गालजीबाग नद्या तुडुंब भरून वाहायला लागल्या असून या तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेतीच्या कामांना प्रारंभ केला आहे.









