रविवारी मेणबत्ती मोर्चाचे आयोजन : मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
बेळगाव : महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला सकल मराठा समाजातर्फे पाठिंबा देण्यात आला आहे. रविवार दि. 5 रोजी सायंकाळी 5 वाजता छत्रपती शिवाजी उद्यान ते धर्मवीर संभाजी चौकापर्यंत मेणबत्ती मोर्चा काढण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला असून मराठा समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने मेणबत्ती मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. येथील जत्तीमठामध्ये गुरुवारी सायंकाळी 5 वाजता सकल मराठा समाजाच्या आयोजित बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. बैठकीमध्ये आंदोलनाला पाठिंब्याचा ठराव मांडण्यात आला. तसेच पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, कायदा मंत्री यांना पत्र पाठवून मराठा आरक्षणासाठी घटना दुरुस्ती करण्यात यावी व तातडीने लोकसभेचे अधिवेशन बोलाविण्यात यावे, असे पत्र पाठविण्याचा निर्णयही घेण्यात आला.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला या आंदोलनाची दखल घ्यावी लागली आहे. सत्ताधारी, विरोधी पक्षाकडून जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यात येत आहे. मात्र याला न जुमानता त्यांनी आपले आंदोलन कायम ठेवले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या भूमिकेवर ठाम आहेत. सर्वसामान्य कार्यकर्त्याकडून सुरू असलेल्या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत असून सीमाभागातील मराठा समाजानेही आंदोलनाला पाठिंबा देणे गरजेचे आहे, असे मत मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आले.
या बैठकीमध्ये उपस्थितीत मान्यवरांकडून महत्त्वाच्या सूचना मांडण्यात आल्या. मराठा समाजाला महाराष्ट्रात आरक्षण मिळाल्यास सीमाभागातील मराठा समाजालाही लाभ होणार आहे. तसेच सीमाचळवळीसाठी जरांगे पाटील यांच्यासारख्या कणखर नेतृत्वाची मदत मिळणार आहे. नुकतीच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांकडून त्यांची भेट घेण्यात आली आहे. या आंदोलनानंतर समितीच्या आंदोलनालाही पाठिंबा दर्शविणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या मोर्चामध्ये शहर, तालुका आदी भागातील मराठा समाजातील नागरिकांनी, संघ-संस्था, युवक मंडळे, महिला मंडळांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. म. ए. समितीचे शहर अध्यक्ष प्रकाश मरगाळे, सरचिटणीस अॅड. एम. जी. पाटील, मालोजी अष्टेकर, नेताजी जाधव, रणजीत हावळण्णाचे, मदन बामणे, दत्ता जाधव, गणेश द•ाrकर, आर. एम. चौगुले, मोतेश बारदेशकर, अनिल पाटील, चंद्रकांत कोंडुस्कर, सुधा भातकांडे आदींनी आपले विचार व्यक्त करून सूचना मांडल्या. यावेळी मराठा समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.