वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नॉर्वे चेसच्या आयोजकांनी बुधवारी टोटल चेस वर्ल्ड चॅम्पियनशिप टूर सुरू करण्याची घोषणा केली, ज्यामध्ये दरवर्षी चार स्पर्धांचा समावेश असेल आणि फास्ट क्लासिक, रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ या विभागांमध्ये मिळून एकच विजेता असेल.
नॉर्वे चेसचे सीईओ केजेल मॅडलँड यांनी सांगितले की, या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघासोबत (फिडे) दीर्घकालीन करार करण्यात आला आहे. तो वार्षिक कार्यक्रम असेल आणि 2027 मध्ये सुरू होईल. ‘आम्हाला अपेक्षा आहे की, टोटल चेस वर्ल्ड चॅम्पियनशिप टूर वर्षभरातील सर्वांत प्रतिष्ठित स्पर्धांपैकी एक बनेल, असे मॅडलँड म्हणाले. ते म्हणाले की, क्लासिकल स्वरूपात आयोजित केली जाणारी जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आणि नव्याने संकल्पित टोटल चेस वर्ल्ड चॅम्पियनशिप टूर या एकमेकांना पूरक असतील. कारण नवी स्पर्धा अधिकृतपणे ‘फिडे’ने मंजूर केली आहे.
नवीन स्पर्धा कोणत्याही विद्यमान फिडे जागितक स्पर्धेतील किताबाची जागा घेणार नाही किंवा त्यावर परिणाम करणार नाही, असे ते म्हणाले. ‘या टूरच्या अंतर्गत दरवर्षी विविध जागतिक शहरांमध्ये चार स्पर्धा होतील. संपूर्ण टूरमध्ये किमान 2.7 दशलक्ष डॉलर्सची वार्षिक बक्षिसे असतील. पहिल्या तीन स्पर्धांसाठी प्रत्येकी साडेसात लाख डॉलर्स, तर अंतिम स्पर्धेसाठी साडेचार डॉलर्सची बक्षिसे शिवाय कामगिरीनुरूप बोनस मिळेल, असे मॅडलँड पुढे म्हणाले,
जागतिक स्तरावर तीन शहरांमध्ये होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेत 24 प्रतिष्ठित खेळाडूंचा समावेश असेल. त्यानंतर चार सर्वोत्तम खेळाडू अंतिम स्पर्धेत जातील. 2026 च्या शरद ऋतूच्या काळात एक प्रायोगिक तत्त्वावर स्पर्धा आयोजित करण्याचे नियोजन आहे. 2027 मध्ये पहिला पूर्ण स्पर्धा हंगाम सुरू होईल, असे त्यांनी सांगितले. नॉर्वे चेस आणि फिडे यांच्यातील करार ऑक्टोबरच्या सुऊवातीला करण्यात आला आहे. टोटल चेस वर्ल्ड चॅम्पियनशिप टूरचे ध्येय फास्ट क्लासिक, रॅपिड आणि ब्लिट्झ या तिन्ही प्रकारांमध्ये प्रभुत्व गाजविणारा खेळाडू शोधणे हे आहे. फास्ट क्लासिक हा क्लासिक बुद्धिबळातील एक नवीन प्रकार आहे, अशी माहिती मॅडलँड यांनी दिली.









