सखल भागात पाणी साचून घरांमध्ये शिरले : झाडे-फांद्या कोसळून नुकसान
प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या अनेक दिवसांपासून हुलकावणी देणाऱ्या वळीव पावसाने शहरासह परिसराला चांगलेच झोडपले. त्यामुळे शहरवासियांना उन्हाच्या चटक्यांपासून दिलासा मिळाला आहे. पावसाच्या दमदार हजेरीमुळे शहरामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचून रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले होते. विजांच्या कडकडाटासह जवळपास तासापेक्षा अधिक काळ पाऊस बरसला. शहरामध्ये किर्लोस्कर रोड येथे झाडाची फांदी कोसळून दुचाकींचे किरकोळ नुकसान झाले आहे. तर कांदा मार्केट परिसरासह ग्लोब थिएटरसमोरील रस्त्यावर यासह सखल भागामध्ये पाणी साचून घरे व दुकानांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे रहिवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.
उन्हाच्या चटक्यामुळे नागरिकांना घरातून बाहेर पडणे असह्या झाले होते. त्यामुळे वळीव पावसाची सर्वांनाच अपेक्षा लागून राहिली होती. शहरासह परिसरात गेल्या महिन्याभरापासून वळीव पावसाने अनेकवेळा हजेरी लावली होती. मात्र, अपेक्षेनुसार पाऊस झाला नव्हता. तुरळक प्रमाणात वळिवाने हजेरी लावली होती. त्यामुळे पुन्हा उष्म्यात भर पडली होती. त्यामुळे दमदार वळीव पावसाची अनेकांना आस लागली होती. शुक्रवारी शहरासह परिसरात वळीव पाऊस झाला होता. मात्र, दमदार झाला नव्हता. शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास आकाशात ढग जमून विजांच्या कडकडाटासह दमदार पाऊस झाल्याने शहरवासियांना दिलासा मिळाला आहे. जवळपास तासापेक्षा अधिक वेळ जोरदार पाऊस झाल्याने शहराच्या सखल भागात पाणी साचले होते. गटारी तुडुंब भरून कचरा रस्त्यावर आला होता. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची चांगलीच तारांबळ उडाली. जोरदार पावसामुळे शहरात विविध कामानिमित्त आलेल्या नागरिकांना तासापेक्षा अधिक वेळ अडकून पडावे लागले. यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती.
शहरामध्ये भेंडी बाजार, पांगूळ गल्ली, भोई गल्ली आदी परिसरात नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. भेंडी बाजार येथे दुकानामध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले. तर पांगूळ गल्ली व भोई गल्ली कॉर्नरवरील झाड कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणतेच नुकसान झाले नाही. कोसळलेल्या झाडांमुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण होऊन रस्त्यावर पाणी साचले होते. सखल भागातील गल्ल्यांमध्ये गुडघाभर पाणी साचल्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण झाला होता. बाजारपेठेत भाजीपाला विक्रेत्यांसह व्यापाऱ्यांना अचानक कोसळलेल्या पावसामुळे आर्थिक फटका बसला आहे.
वीजपुरवठा खंडित
सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या दमदार पावसामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्या तर काही ठिकाणी लहान-सहान झाडे कोसळली. त्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरू असल्याने हेस्कॉम कर्मचाऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली.
सदाशिवनगरात झाडे कोसळली
सदाशिवनगर येथेही अनेक झाडांच्या फांद्या कोसळल्या. तर काही ठिकाणी झाडे कोसळली आहेत. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. उशिरापर्यंत रस्त्यावर पडलेली झाडे व फांद्या हटविण्याचे काम सुरू होते. मदतयंत्रणा न मिळालेल्या भागामध्ये नागरिकांनी स्वत:हून फांद्या हटविल्या.
तालुक्याच्या परिसरातही काही भागात तुरळक प्रमाणात तर काही भागात दमदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेती मशागतीच्या कामांना हा पाऊस अत्यंत उपयोगी ठरल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून व्यक्त करण्यात येत आहे.
ग्लोब थिएटर समोरील रस्त्यावर तलावाचे स्वरुप
ग्लोब थिएटर समोरील खानापूर रोडवर पावसाचे पाणी साचल्याने रस्त्यावर तलावाचे स्वरुप आले होते. गटारी तुडुंब भरून वाहल्याने गटारीतील कचरा रस्त्यावर विखुरला होता. सोसाट्याच्या वाऱ्यासह दमदार पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.









