खड्ड्यामुळे रस्त्याची दुर्दशा : वाहनधारकांचे हाल : त्वरित दुरुस्तीची मागणी
वार्ताहर/कणपुंबी
कर्नाटक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जांबोटी-कणकुंबी भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली असून राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गाबरोबरच या भागातील सर्व अॅप्रोच रस्ते खड्ड्यांत हरवले आहेत. या भागातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे शासनाचे दुर्लक्ष झालेले असून सरकारच्या उदासीनतेमुळे विकासकामांचा बोजवारा उडाला आहे.वास्तविक जांबोटी-कणकुंबी भाग अनेक गैरसोयीनी व्यापलेला आहे. या भागातील रस्ते, लाईट, वाहतूक, पाणी, रोजगार व इतर अनेक समस्या भेडसावत आहेत. कणकुंबी भागासह बैलूर भागातील काही अॅप्रोच रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट बनली आहे. या भागातील अॅप्रोच रस्त्यावरून चारचाकी किंवा इतर वाहने तर सोडाच. परंतु साधी दुचाकीसुद्धा चालवणे महाकठीण होऊन बसले आहे.
या भागातील रस्त्यांपैकी देवाचीहट्टी ते तोराळी हा रस्ता पूर्णपणे खड्ड्यात बुडाला आहे. देवाचीहट्टी येथील हेळेदेव ते तोराळीपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण शोधुनही सापडणार नाही. तोराळी सीआरपीएफच्या वाहनांमुळे रस्त्याची वाताहत झाली आहे. तसेच गोल्याळी ते बेटगेरी, बैलूर ते बाकमूर, बैलूर ते बैलूर क्रॉस तसेच बैलूर ते देवाचीहट्टी आणि बैलूर ते कुसमळी हे सर्व रस्ते म्हणजे मृत्युचा सापळाच बनले आहेत. याव्यतिरिक्त हब्बनहट्टी ते हनुमान पेट्रोलपंप, चिखले क्रॉस ते चिखले, कणकुंबी ते चिगुळे या रस्त्यांची चाळण झाली आहे. सडा, मान, हुळंद तसेच कणकुंबी ते तळावडे या रस्त्यांची तर अवस्था जगावेगळीच आहे. या गावांना पावसाळ्यात दुचाकी देखील जात नाही. एकंदरीत सर्व रस्ते खड्ड्यांत हरवल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते. सद्यस्थितीत बैलूर परिसरातील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. तर कणकुंबी भागातील रस्ते वनखात्याच्या आडकाठी धोरणांमुळे प्रलंबित आहेत.









