प्रतिबंधित ‘अॅनाबॉलिक स्टिरॉइड’ वापरल्याबद्दल ‘नाडा’च्या शिस्तपालन समितीची कारवाई
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतातील तिहेरी उडीतील अव्वल अॅथलीट ऐश्वर्या बाबू हिच्यावर प्रतिबंधित अॅनाबॉलिक स्टिरॉइड वापरल्याबद्दल राष्ट्रीय उत्तेजकविरोधी एजन्सीच्या (नाडा) शिस्तपालन समितीने चार वर्षांसाठी बंदी घातली आहे. जागतिक उत्तेजकविरोधी एजन्सीच्या (वाडा) प्रतिबंधित यादीत असलेल्या स्टिरॉइडसंदर्भातील चाचणी सकारात्मक आल्यानंतर धावपटू एस. धनलक्ष्मीसह या 25 वषीय खेळाडूला गेल्या वर्षीच्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेतून वगळण्यात आले होते.
13 फेब्रुवारी रोजी ‘नाडा’च्या अपिल पॅनलकडून बंदीची नोटीस मिळाल्यानंतर ऐश्वर्याकडे बंदीच्या विरोधात दाद मागण्यासाठी 6 मार्चपर्यंत वेळ आहे. तिची चाचणी ‘ऑस्टारिन’संदर्भात सकारात्मक आली असून गेल्या वषी चेन्नई येथे 13 आणि 14 जून रोजी राष्ट्रीय आंतरराज्य स्पर्धेच्या दरम्यान ही चाचणी घेण्यात आली होती. ऐश्वर्याने या स्पर्धेत 14.14 मीटरचा राष्ट्रीय विक्रम मोडत तिहेरी उडीत सुवर्णपदक जिंकले होते. चाचणी सकारात्मक आल्यानंतर गेल्या वषी जुलैमध्ये तिला तात्पुरते निलंबित करण्यात आले होते. ऐश्वर्याने तिच्यावरील चार वर्षांच्या बंदीचे सहा महिने आधीच भोगले आहेत.
ऐश्वर्याने तिची बाजू मांडताना म्हटले होते की, तिने कामगिरी सुधारण्यासाठी कोणताही प्रतिबंधित पदार्थ घेतला नाही. फेब्रुवारी, 2021 मध्ये जिममध्ये वजन उचलताना तिचा खांदा निखळला होता. उपचार घेऊन या दुखापतीतून ती सावरली होती. राष्ट्रीय आंतरराज्य स्पर्धेची तयारी करताना तिने स्वत:वर खूप ताण टाकला होता. त्यामुळे तिला त्याच ठिकाणी म्हणजे खांद्यावर वेदनादायी अस्वस्थता जाणवू लागली होती.
त्याच जोमाने प्रशिक्षण व सराव सुरू ठेवल्यास दुखापत पुन्हा डोके वरू काढू शकते या भीतीने आपण या विषयावर सहकारी जगदीश याच्याशी चर्चा केली होती, जो एक क्रीडापटू देखील आहे. जगदीशने आपल्याला ऑस्टारिन गोळी घेण्यास सूचवले आणि ती गोळी पूर्णपणे सुरक्षित आहे तसेच वेदनांपासून मुक्त होण्यास आणि स्नायूंना ठीक करण्यास ती मदत करेल, असा दावा केला, असे ऐश्वर्याने आपली बाजू मांडताना म्ह्टले होते. पण ऐश्वर्याने इस्पितळ किंवा नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाकडे उपचारांसाठी का संपर्क साधला नाही, असा सवाल ‘नाडा’च्या शिस्तपालन समितीने उठवला. तिने नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि सहकाऱ्याच्या सल्ल्यानुसार ऑस्टारिन गोळी घेतले, असेही समितीने म्हटले आहे.









