सरकारनेच गायब करविल्याचा संशय
वृत्तसंस्था/ बीजिंग
चीनमध्ये एक हायप्रोफाइल बँकर बेपत्ता झाल्याने फिनटेक उद्योगक्षेत्रात खळबळ उडाली आहे. रेनेसां कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बाओ फॅन यांच्याशी संपर्क होत नसल्याचे त्यांच्या कंपनीने सांगितले. बाओ बेपत्ता झाल्याची माहिती समोर येताच या कंपनीचे समभाग 50 टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. बाओ यांची एका कथित भ्रष्टाचाराप्रकरणी अनेक महिन्यांपासून चीनच्या यंत्रणांकडून चौकशी केली जात होती.
2021 मध्ये क्षी जिनपिंग यांच्या सरकारने चीनमधील वित्तीय क्षेत्राविरोधात मोर्चा उघडला होता. आतापर्यंत या कथित चौकशीमुळे देशातील अनेक कंपन्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. चीनचा मोठा उद्योगपती बेपत्ता होण्याची ही पहिलीच वेळ नाही. चीनचे सरकार कुठल्याही प्रकरणी संशयितांना कायदेशीर मदतीशिवाय अनेक वर्षापर्यंत कोठडीत डांबून ठेवू शकते.
2017 मध्ये चीनमधील अब्जाधीश उद्योजक शियाओ जिआनहुआ हे हाँगकाँग येथून बेपत्ता झाले होते. शियाओ यांना चीनच्या तपास यंत्रणेने उचलून नेले होते. याच्या 5 वर्षांनी ते चीनमध्ये 13 वर्षांची शिक्षा भोगत असल्याचे समोर आले होते. तर अलीबाबाचे संस्थापक आणि जगप्रसिद्ध उद्योजक जॅक मा हे एक वर्षासाठी गायब हेत. चीन सरकारवर टीका केल्यावर त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. गुओताई हुनान इंटरनॅशनलचे प्रमुख यिम फुंग यांना 2015 मध्ये चीनच्या सरकारने कुठलीही माहिती न देता ताब्यात घेतले होते.
चीनचे वॉरेन बफे म्हटले जाणाऱया गुआंगचांग यांना जिनपिंग सरकारने 2015 साली विमानतळावरुन ताब्यात घेतले होते. चीनमध्ये जेव्हा एखादा उद्योजक गायब झाल्यावर जगाचे लक्ष वेधले जाते. चीनचे अध्यक्ष जिनपिंग हे स्वतःच्या टीकाकारांना सरसकटपणे तुरुंगात डांबत असल्याचे वारंवार दिसून आले आहे.









