वृत्तसंस्था/ लंडन
येथे येत्या सोमवारपासून सुरु होणाऱ्या 2023 च्या टेनिस हंगामातील तिसऱ्या वेंबल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत स्पेनचा कार्लोस अॅल्कारेझ आणि पोलंडची इगा स्वायटेक यांना अनुक्रमे पुरुष आणि महिलांच्या विभागात टॉप सिडींग देण्यात आली आहे.
या स्पर्धेत प्रवेश करण्यापूर्वी अॅल्कारेझला यापूर्वी घोषित करण्यात आलेल्या एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत पहिले स्थान देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे महिलांच्या विभागात पोलंडच्या स्वायटेकने अग्रस्थान महिला टेनिसपटूंच्या मानांकनात मिळविले आहे. स्पेनच्या अॅल्कारेझने सर्बियाच्या जोकोव्हिचला अग्रस्थानावरुन खाली खेचले आहे. स्पेनच्या अॅल्कारेझची ही तिसरी विंबल्डन स्पर्धा आहे. 2021 साली झालेल्या विंबल्डन स्पर्धेत अॅल्कारेझने पदार्पनातच दुसऱ्या फेरीपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर 2022 च्या विंबल्डन स्पर्धेत अॅल्कारेझने चौथी फेरी गाठली होती.
पुरुष एकेरीत यावेळी अॅल्कारेझ आणि जोकोव्हिच यांच्यात जेतेपदाची लढत होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जोकोव्हिचने गेल्या महिन्यात फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकली होती. आता तो विंबल्डन स्पर्धा जिंकून स्विसच्या रॉजर फेडररच्या विक्रमाशी बरोबरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. 36 वर्षीय जोकोव्हिचने विंबल्डन स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत सात वेळेला पुरुष एकेरीचे अजिंक्यपद मिळविले आहे. फेडररने ही स्पर्धा आठ वेळा जिंकली आहे. विंबल्डन स्पर्धेमध्ये जोकोव्हिची कामगिरी आतापर्यंत दर्जेदार झाली असून त्याने गेल्या 4 विंबल्डन स्पर्धांमध्ये एकही सामना गमावलेला नाही. 2017 साली झालेल्या विंबल्डन स्पर्धेत जोकोव्हिचने बर्डीच विरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यातून दुखापतीमुळे निवृत्ती पत्करली होती. सर्बियाचा जोकोव्हिच यावेळी ग्रँडस्लॅम अजिंक्यपदाची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करीत 2023 च्या टेनिस हंगामात जोकोव्हिचने ऑस्ट्रेलिया आणि फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकल्या आहेत. जोकोव्हिचने आपल्या वैयक्तिक टेनिस कारर्किदीत 23 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविली असून त्याने नदालच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. सोमवारपासून सुरु होणाऱ्या विंबल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेत पुरुष एकेरीत रशियाच्या मेदवेदेवला मानांकनात तिसरे तर नॉर्वेच्या कास्पर रुडला चौथे स्थान देण्यात आले आहे.