मारुतीने 30 वर्षांचा जूना विक्रम मोडला : अन्य कंपन्यांची मजबूत कामगिरी
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
देशातील टॉपच्या 3 ऑटोमोबाईल कंपन्या मारुती, ह्युंइाई आणि टाटा मोटर्सने नवरात्रीच्या पहिल्या दिवशी 51 हजारांहून अधिक कार विकल्या. 22 सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू झाल्यामुळे कारच्या किमती 4 वर्षांपूर्वीच्या पातळीवर पोहोचल्या आहेत. याशिवाय, कंपन्या 10 टक्केपेक्षा जास्त सणासुदीची सवलत देखील देत आहेत. कार स्वस्त झाल्यानंतर कंपन्यांनी विक्रमी विक्री नोंदवली आहे.
30 वर्षांचा विक्री विक्रम मोडला
22 सप्टेंबर रोजी मारुतीने सुमारे 30,000 कार विकल्या आणि 80,000 लोकांनी कार खरेदीसंदर्भात चौकशी केली. कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या 30 वर्षातील हा सर्वोत्तम प्रतिसाद आहे. लहान कारच्या किमती 10-15 टक्केने स्वस्त झाल्या, ज्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांना शोरूममध्ये पोहोचता आले.
ह्युंडाईचा 5 वर्षांचा विक्री विक्रम मोडला
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ह्युंडाईने सुमारे 11,000 वाहनांची विक्री केली, हा गेल्या 5 वर्षातील त्यांचा एक दिवसाचा सर्वोत्तम विक्रम आहे. कंपनीच्या मते, ग्रँड आय10 निओस आणि क्रेटा या गाड्यांना सर्वाधिक मागणी आहे. एका डीलरने सांगितले की कर कपातीमुळे सकाळपासूनच शोरूममध्ये गर्दी होती.
टाटाने 10,000 कार डिलिव्हर केल्या
टाटाने पहिल्या दिवशी 10,000 हून अधिक गाड्या डिलिव्हर केल्या. नेक्सॉन आणि पंच सारख्या एसयूव्ही मॉडेल्सना सर्वाधिक मागणी आहे. टाटाच्या प्रवक्त्याने सांगितले की ही सुरुवात आहे आणि येत्या काळात विक्री आणखी वाढेल. हॅचबॅक विभाग अत्यंत स्पर्धात्मक आहे, ज्यामुळे उत्पादक जास्त सवलती देत आहेत. त्याउलट, सेडान, एसयूव्ही आणि एमपीव्हींवर उपलब्ध सरासरी प्रोत्साहने कमी आहेत. या वर्षी जानेवारी ते जून या कालावधीत 22 लाख वाहनांची विक्री झाली. विक्रीत फक्त 1.4 टक्क्यांनी वाढ झाली. कंपन्यांवर विक्री वाढवण्याचा दबाव आहे. ऑगस्टमध्ये कंपन्यांकडे 56 दिवसांचा स्टॉक होता.









