शरीराच्या कोणत्याही भागाला काही विकार किंवा इजा झाल्यास अशा व्यक्तीला त्वरित डॉक्टरकडे घेऊन जाण्याची रीत आहे. त्वचा, डोळे, कान, इत्यादी नाजूक अवयवांना काही त्रास होत असल्यास त्या अवयवांच्या तज्ञांकडे अशा रुग्णांना नेले जाते. तेथे औषधोपचार किंवा शस्त्रक्रिया आदी मार्गांनी रुग्ण बरा केला जातो. तथापि, नेत्रविकार जीभेने दूर करण्याचा दावा करणारी एक महिला आहे. सध्या या महिलेची चर्चा मोठ्या प्रमाणावर होत आहे. ही महिला नेत्ररुग्णाला आपल्या जवळ बसवून घेते आणि त्याच्या डोळ्यात आपली जीभ घालते. तसेच आपली लाळही ती त्याच्या डोळ्यात सोडते. हे दृष्य बघणे अंगावर काटा आणणारे असते.
तथापि, यामुळे डोळे बरे होतात, असा या महिलेचा दावा आहे. तिच्यावर श्रद्धा असणाऱ्यांची संख्याही कमी नाही. हा उपाय खरोखर यशस्वी होतो का, हा संशोधनाचा विषय आहे. अनेक नेत्रतज्ञांनी हा उपाय शास्त्रीय नसल्याचे स्पष्ट करत यामुळे डोळ्यांची अधिक मोठी हानी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. जीभेने डोळे बरे करण्याचा दावा करणारी ही महिला भारतातील नसून आफ्रिकेतील असल्याचे सांगितले जाते. डोळे बरे करण्याचा हा प्रकार अघोरी असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली असून हा उपाय शाहण्या माणसांनी करु नये, असेही बहुतेकांचे मत आहे. पण जगात अशा प्रकारची कृत्ये चालतात आणि त्यांवर विश्वास ठेवणारी माणसेही असतात. एकंदर, या जीभेने डोळे बरे करण्याच्या प्रकारचा सखोल शोध झाला पाहिजे आणि अशी श्रद्धा ठेवणाऱ्या लोकांचे योग्य प्रकारे प्रबोधन केले पाहिजे, अशी मागणी अनेकजण करताना दिसून येतात.