खंडपीठातील दोन न्यायाधीशांच्या अनुपस्थितीमुळे निर्णय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलली आहे. खंडपीठातील पाच न्यायाधीशांपैकी न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती रवींद्र एस भट हे दोघे 24 एप्रिलच्या सुनावणीदरम्यान उपस्थित राहणार नसल्यामुळे युक्तिवाद लांबणीवर पडणार आहे. पुढील सुनावणीसाठी अद्याप कोणतीही तारीख निश्चित करण्यात आलेली नाही.
20 एप्रिल हा खटल्याच्या सुनावणीचा तिसरा दिवस होता. न्यायालयाने सर्व याचिकाकर्त्यांना सोमवार, 24 एप्रिलपर्यंत न्यायालयात आपले म्हणणे मांडण्यास सांगितले होते. त्यावर सरन्यायाधीशांनीही कामकाज एक तास लवकर सुरू करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, आता न्यायमूर्तींच्या अनुपलब्धतेमुळे सुनावणी पुढे ढकलली आहे.
आतापर्यंतच्या सुनावण्यांमध्ये सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी समलिंगी विवाहाबाबत केंद्राची भूमिका मांडली. समलिंगी विवाहाच्या बाजूने याचिकांवर ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी आणि मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद केला. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती एस. के. कौल, न्यायमूर्ती एस. रवींद्र भट, न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.









