शेतकऱयांना तातडीने हरकती नोंदविण्याचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
रिंगरोडला येथील शेतकऱयांनी तीव्र विरोध केला आहे. आतापर्यंत 448 शेतकऱयांनी हरकत दाखल केली आहे. हरकती दाखल करण्याचा शेवटचा दिवस शुक्रवार असून दुपारी 4.30 पर्यंत हरकती दाखल करण्यास वेळ देण्यात आला आहे. तेव्हा उर्वरित शेतकऱयांनी तातडीने अर्ज दाखल करावेत, असे आवाहन म. ए. समितीसह वकिलांनी केले आहे.
रिंगरोडसाठी हजारो एकर जमीन घेण्याचा घाट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घातला आहे. त्याबाबत वृत्तपत्रातून नोटिफिकेशन देण्यात आले होते. तालुक्मयातील 31 गावांमधील सुपीक जमिनीतून हा रिंगरोड होत आहे. त्यामुळे शेतकऱयांनी त्याला तीव्र विरोध केला आहे. शेतकऱयांना हरकती दाखल करण्यासाठी 21 दिवसांचा अवधी दिला आहे. आता शुक्रवारी शेवटचा दिवस असून तत्पूर्वी सर्वांनी हरकती दाखल कराव्यात, असे वारंवार आवाहन करण्यात आले आहे.
आतापर्यंत बहुसंख्य शेतकऱयांनी हरकती दाखल केल्या असल्या तरी अजूनही काही शेतकऱयांनी हरकती दाखल केल्या नाहीत. तेव्हा येत्या दोन दिवसांत सर्वांनी हरकती दाखल कराव्यात, त्यामुळे निश्चितच सर्वांना फायदा होणार आहे. हरकती दाखल केल्यानंतर रस्त्यावरील लढाई लढावी लागणार आहे. याचबरोबर न्यायालयात धाव घेऊन लढा द्यावा लागणार आहे. तेव्हा शेतकऱयांनी यासाठी सज्ज झाले पाहिजे, असे आवाहन तालुका म. ए. समितीतर्फे करण्यात आले आहे.
बुधवारी 62 जणांनी आपल्या हरकती दाखल केल्या आहेत. यावेळी ऍड. एम. जी. पाटील, ऍड. श्याम पाटील यांच्यासह संजय पाटील व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.









