आवक कमी, काही भाज्यांच्या दरात घट
प्रतिनिधी/ बेळगाव
मागील काही दिवसांपासून काही भाजीपाल्यांच्या दरात घट होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळत आहे. कोथिंबीर, टोमॅटो, मेथी, कांदापात, पालक, कोबी आदी भाजीपाल्यांचे दर कमी झाले आहेत. मात्र ढबू मिरचीची आवक कमी झाल्याने ढबूने शंभरी गाठली आहे. त्याचबरोबर इतर भाजीपाल्यांच्या किंमती मागील आठवडय़ाच्या तुलनेत स्थिर असल्याचे पहायला मिळत आहे.
शनिवारच्या आठवडी बाजारात हिरवा वाटाणा 100 रु. किलो, काकडी 60 रुपये किलो, बिन्स 60 रु. किलो, बटाटा 30 रु. किलो, कारली 40 रु. किलो, ढबू 100 रु. किलो, ओली मिरची 60 रु. किलो, वांगी 40 रु. किलो, भेंडी 60 रु. किलो, गाजर 40 रु. किलो, गवार 60 रु. किलो, नवलकोल 20 रुपयाला 4, कोबी 20 रु. एक, कोथिंबीर 10 रुपयाला एक पेंडी, मेथी 10 रुपयाला एक, पालक 20 रुपयाला चार, कांदापात 20 रुपयाला चार, फ्लॉवर 40 रुपयाला एक असा भाजीपाल्यांचा दर आहे.
यंदा उन्हाळय़ापासून जून महिन्यापर्यंत भाजीपाल्यांच्या दरात भरमसाठ वाढ झाली होती. उन्हाळय़ातील भाजीपाला पिकाला पावसाचा फटका बसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली होती. जुलै महिन्यापासून भाजीपाल्यांचे दर काही प्रमाणात कमी झाले आहेत. तर काही भाज्यांचे दर अद्याप स्थिर आहेत. शिवाय आठवडी बाजारात भाज्यांची म्हणावी तशी आवक पहायला मिळत नाही. त्यामुळे नागरिकांना मिळेल ती भाजी खरेदी करावी लागत आहे.
खाद्यतेलांचे दर स्थिर
युपेन-रशियाच्या युद्धामुळे खाद्यतेलांचे दर गगनाला भिडले होते. दरम्यान मध्यंतरी किंचित खाद्यतेलांचे दर कमी झाले होते. मात्र अद्याप अपेक्षेप्रमाणे खाद्यतेलांच्या किंमती कमी न झाल्याने सर्वसामान्यांना चटका सहन करावा लागत आहे. खाद्यतेलांच्या किंमती कमी होतील, अशी आशा सर्वसामान्यांना होती. मात्र अद्याप म्हणाव्या तशा किंमती कमी झाल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांना अधिक दर देवूनच खाद्यतेल खरेदी करावे लागत आहे..









