प्रतिकिलो 70 रुपये, सर्वसामान्यांना फटका
प्रतिनिधी /बेळगाव
मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी पावसामुळे टोमॅटो पिकावर परिणाम झाला आहे. त्यामुळे टोमॅटोची आवक मंदावली आहे. परिणामी टोमॅटोचे दर भरमसाट वाढले आहेत. आठ-दहा दिवसांपूर्वी दहा ते पंधरा रुपये किलो मिळणारा टोमॅटो आता 70 रुपये झाला आहे. त्यामुळे गृहिणींची चिंता वाढली आहे.
भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सर्रास भाजीपाला प्रतिकिलो 70 रुपयांहून पुढे गेला आहे. त्याचबरोबर स्वयंपाक घरातील महत्त्वाचा घटक असलेल्या टोमॅटोचे भाव वाढल्याने सर्वसामान्यांना फटका बसत आहे. सध्या 70 ते 80 रुपये प्रतिकिलो दराने टोमॅटो किरकोळ बाजारात विक्री होत आहे. मागील काही दिवसांत अनेक भागात वळिवाने हजेरी लावली आहे. सतत होणारा पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. टोमॅटोच्या पिकावर मोठा परिणाम झाला आहे. परिणामी बाजारात भाज्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत.
मागील पंधरा दिवसांपासून टोमॅटो दरात हळूहळू वाढ होऊन टोमॅटोचा दर प्रतिकिलो 70 रुपयांहून पुढे गेला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना टोमॅटो खरेदी करणे कठीण झाले आहे. टोमॅटोला पर्याय म्हणून चिंचेला मागणी वाढली आहे.









