वृत्तसंस्था/ कोलंबो
येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियात होणाऱया टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू टॉम मुडी लंकन क्रिकेट संचालकपद सोडणार असल्याचे सांगण्यात आले.
लंकन क्रिकेट मंडळाने यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या 56 वषीय टॉम मुडीसमवेत क्रिकेट संचालकपदासाठी 3 वर्षांचा करार केला होता. लंकन क्रिकेट मंडळ आणि मुडी यांच्या परस्पर संमतीने हा करार संपवण्याचा निर्णय घेतला गेला. दरम्यान, लंकन क्रिकेट मंडळाची आर्थिक स्थिती सध्या खूपच खालावली आहे. लंकन क्रिकेट मंडळाला मुडीबरोबर केलेल्या कराराची रक्कम देणे अवघड झाले आहे. त्यामुळे मुडीने हे पद सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे या मंडळाचे सचिव मोहन डिसिल्वा यांनी सांगितले. टॉम मुडीने लंकन क्रिकेट संचालकपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर या खेळाडूला लंकन मंडळाकडून प्रतिदिनी 1850 डॉलर्स आणि इतर भत्ता देण्यात येत होता. वर्षातील 100 दिवसांसाठी मंडळाकडून ही रक्कम मुडीला दिली जात असे. मुडीने क्रिकेट संचालकपद सोडण्याचा निर्णय घेतल्याने लंकन क्रिकेट मंडळाचे किमान 40 दशलक्ष डॉलर्सची रक्कम वाचली आहे. या महिन्याच्या अखेरीस टॉम मुडी ऑस्ट्रेलियाला परतणार असल्याचे समजते. गेल्या वषीच्या फेब्रुवारीमध्ये लंकन क्रिकेट मंडळाने टॉम मुडीची क्रिकेट संचालकपदी नियुक्ती केली होती. तत्पूर्वी तो लंकन संघाचा प्रमुख प्रशिक्षकही होता.









