शेतकऱ्यांनी विरोध करत वसुली बंद करण्यास भाग पाडले : पुन्हा अधिकाऱ्यांना धारेवर : पोलीस बंदोबस्तात आजपासून टोल आकारणार
खानापूर : बेळगाव-गोवा रस्त्यावर गणेबैल येथे शुक्रवारी पुन्हा टोल आकारणीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू होते. मात्र यावेळी शेतकऱ्यांनी जोरदार विरोध करत वसुली बंद करण्यास भाग पाडले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी या ठिकाणी पुन्हा अधिकाऱ्यांना धारेवर धरून शुक्रवारी आकारण्यात येणारी टोलआकारणी बंद केली आहे. मात्र अधिकाऱ्यांनी या ठिकाणी टोलआकारणी करण्याचा चंग बांधला असून त्यांनी पुन्हा शनिवारपासून पोलीस बंदोबस्तात टोल सुरू करण्याचे स्पष्ट केले आहे. गेले पंधरा दिवस वसुलीवरून वेळोवेळी शेतकरी आणि स्थानिकांनी आंदोलन करून टोलआकारणी बंद पाडलेली आहे. मात्र शुक्रवारी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी गणेबैल येथील टोल प्लाजावर येऊन पुन्हा टोल सुरू करण्यासाठी प्रयत्न करत असताना तालुका भाजपाध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यासह इतरानी या ठिकाणी येऊन टोलआकारणी बंद केली आहे.
नुकसानभरपाई देण्यास बंधनकारक, पण टोलआकारणी थांबवत नाही
याबाबत राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी किरण गुब्बनवर यांना विचारले असता ते म्हणाले की, आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे पोलीस संरक्षण मागितले आहे. पोलीस संरक्षणात टोलआकारणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शेतकऱ्यांना जी नुकसानभरपाई देण्याचा अधिकार आमच्याकडे होता ती नुकसानभरपाई आमच्याकडून शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. मात्र शेतकऱ्यांना जादाची नुकसानभरपाई हवी आहे. त्यांनी ती मिळवण्यासाठी लवादाकडे अर्ज केले आहेत. लवादाकडून जी आर्थिक नुकसानभरपाई मंजूर होईल ती देण्यास आम्ही बंधनकारक आहोत. मात्र यासाठी टोलआकारणी थांबवू शकत नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
खासदारांनी लक्ष घालणे गरजेचे
स्थानिक आमदार भाजपचे आहेत. खासदार भाजपचे आहेत. तसेच केंद्रात भाजपची सत्ता आहे. स्थानिक पातळीवर आंदोलन करून बंद पाडण्यापेक्षा राष्ट्रीय महामार्ग हा केंद्राच्या अखत्यारीत येत असून याबाबत खासदार खासदार अनंतकुमार हेगडे यांनी स्वत: लक्ष घालून याबाबत रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करणे गरजेचे आहे. गेल्या दोन वर्षात खासदार अनंतकुमार हेगडे यांचे दर्शनही दुर्मीळ झाले आहे. त्याबाबत सामान्य जनतेकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. अनंतकुमार हेगडे यांनी एकदाही प्रयत्न केलेले नाहीत तसेच खानापूर शहरातून जाणारा राजा टाईल्स ते गोवा क्रॉस हा रस्ता ही संपूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. याबाबतही अनंतकुमार हेगडे यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र त्यांच्याकडून काहीही प्रयत्न होत नसल्याने खानापूर शहरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. यासाठी खासदारानी दिल्लीत अधिवेशन सुरू असल्याने याबाबत गांभीर्याने लक्ष घालून महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून टोल आकारणीबाबबत तसेच रस्त्याच्या नुकसानभरपाईसाठी प्रयत्न करावे, अशी मागणी होत आहे.
येत्या एक-दोन दिवसात टोलआकारणी निश्चित…
आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे पोलीस संरक्षण मागितलेले आहे. पोलीस संरक्षणात आम्ही टोल आकारणी सुरू करणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच बायपास रस्ता अथवा सर्व्हिस रस्त्यायाबाबत ते बोलताना म्हणाले की, जो प्रोजेक्ट तयार होतो. त्या प्रोजेक्टनुसार आम्ही काम केलेले आहे. सुधारित प्रोजेक्टसाठी संबंधितांनी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे. जर राष्ट्रीय महामार्गाकडून याबाबतचा आराखडा मंजूर झाल्यास आम्ही तेही काम अगदी वेळेत पूर्ण करू शकतो. मात्र याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून अद्याप कोणताही आराखडा नसल्याने आम्ही त्याबाबत बांधील नाही, यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे असे ते ‘तऊण भारत’शी बोलताना म्हणाले. यावरून स्पष्ट होत आहे की, येत्या एक-दोन दिवसात गणेबैल येथील टोल नाक्मयावरून टोलआकारणी सुरू होणार हे निश्चित आहे.









