पणजी : बांबोळी येथील गोमेकॉ संकुलात असलेल्या सुपर स्पेशालिटी विभागात (एसएसबी) आता रुग्णांसाठी टोकन पद्धत लागू करण्यात आली असून त्याची कार्यवाही सुरु झाली आहे. ओपीडीमध्ये सकाळी 8 वा.पासून टोकन नंबर देण्यात येणार असून त्या नंबरानुसार रुग्णांना पुढे पाठवले जाणार आहे. गोमेकॉचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश पाटील यांनी त्याची अधिसूचना जारी केली आहे. यापूर्वी रुग्णांच्या रांगेनुसार त्यांना पुढे प्रवेश देण्यात येत होता. त्यात गोंधळ होत असल्याच्या तक्रारी वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. टोकन नंबरानुसार रुग्णांचे पुढे नोंदणी केली जाणार असून सर्वांना सोयीस्कर होण्यासाठी ही पद्धत सुरु करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
सुपर स्पेशालिटी विभागात रुग्णांची मोठी गर्दी होत असून रांगेनुसार प्रवेश देण्यात येत असताना काहीजण मध्येच रांगेत घुसत असल्याने गोंधळ, वाद वाढत असल्याने ते प्रकार रोखण्यासाठी आता टोकन बंधनकारक करण्यात आले आहे. टोकनाची पद्धत मर्यादित संख्येच्या रुग्णांसाठीच करण्यात आली असून त्यामुळे टोकनसाठी आता सकाळी लवकरच रांगा लागतील, असा अंदाज आहे. सदर विभागात आरोग्य तपासणीसाठी चांगल्या अत्याधुनिक साधन-सुविधा देण्यात आल्या असून गोमेकॉतील अनेक रुग्णांना त्या विभागात पाठवले जाते किंवा भरती करण्यात येते. तेथील गर्दीवर नियंत्रण राहावे म्हणून सदर टोकनची पद्धत अवलंबण्यात आल्याचे सूत्रांनी नमूद केले.









